जनादेश पुणे व एस. जी. ग्रुप यू.पी. यांच्यात आज अंतिम सामना
शिरपूर : शिरपूर येथे एस. व्ही. के. एम. टी-20 महिला चॅम्पियन्स ट्रॉफी-2022 च्या सामन्यांमध्ये पाच खेळाडूंनी शानदार शतक झळकावले असून 8 जून रोजी स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी जनादेश संघ पुणे व एस. जी. ग्रुप ऑफ कंपनी यू.पी. यांच्यात आज अंतिम सामना होणार आहे.

शिरपूर येथे तीन भव्य मैदानांवर भारतातून आलेल्या अनेक राज्यातील महिला खेळाडूंचे संघ शानदार क्रिकेटचे प्रदर्शन करत असून आतापर्यंत एकूण पाच महिला खेळाडूंनी शानदार शतक करत उत्कृष्ट क्रिकेट खेळाचे प्रदर्शन घडविले आहे.
सात जून रोजी पहिला सेमी फायनल सामना आर. सी. पटेल फार्मसी महाविद्यालयाच्या भव्य मैदानावर खेळविण्यात आला. हा सामना कर्मवीर फायटर्स शिरपूर विरुद्ध जनादेश पुणे संघात झाला. नाणेफेक जिंकून कर्मवीर संघाने प्रथम फलंदाजी करत 20 षटकात 141/5 धावा केल्या. प्रत्युत्तरात जनादेश पुणे संघाने 18 व्या षटकात 146/5 धावा करत विजय मिळविला. सदर सामन्यात जनादेश संघाची पुणे येथील जनादेश महिला क्रिकेट संघाची सर्वोत्कृष्ट खेळाडू किरण नवगिरे 49 चेंडूत 210 धावा करत या स्पर्धेतील आतापर्यंतचे सर्वात जलद शतक झळकावले तसेच 04-02-14-01 याप्रमाणे गोलंदाजी करत अष्टपैलू खेळाचे प्रदर्शन केले. तिला वुमन्स ऑफ द मॅच पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.7 जून रोजी दुसरा सेमीफायनल सामना के. के. सी. ए. उत्तरप्रदेश विरुद्ध एस. जी. ग्रुप ऑफ कंपनी यू.पी. यांच्यात झाला. के. के. सी. ए. संघाने 75/10 (18.4) धावा केल्या. प्रत्युत्तरात एस. जी. ग्रुप ऑफ कंपनीने 76/2 (13.2) धावा करत सामना 8 गडी राखून जिंकला. विमेन ऑफ द मॅच पुरस्कार शानू यादव हिला देण्यात आला, जिने 36 चेंडूत 39 धावा आणि 4 षटकात 13 धावा देऊन 2 बळी घेतले.तांडे येथील मुकेश पटेल सीबीएसई स्कूलच्या भव्य मैदानावर 4 जून रोजी सरस्वती इन्स्टिट्यूट ऑफ लॉ हरियाणा क्रिकेट संघाची खेळाडू शालिनी कुमारी हिने रुरल क्रिकेट अकॅडमी तेलंगणा संघाविरुद्ध 60 चेंडू 118 धावा केल्या.3 जून रोजी सावळदे येथे एस. व्ही. के. एम., एन. एम. आय. एम. एस. येथील भव्य मैदानावर कर्मवीर फायटर्स शिरपूर संघाची खेळाडू नेहा बाडविक हिने एस. पी. सी. सी. संघाविरुद्ध 60 चेंडूत नाबाद 103 धावा केल्या.
तर याच मैदानावर याच दिवशी एस. जी. ग्रुप ऑफ कंपनी उत्तर प्रदेश ची खेळाडू आर्शी चौधरी हिने वॉरियर्स स्पोर्टस संघाविरुद्ध 59 चेंडूत 126 धावा केल्या.2 जून रोजी याच मैदानावर एच. पी. रॉयल्स पुणे संघाची खेळाडू शिल्पा साहू हिने पुणे गेम चेंजर संघाविरुद्ध 56 चेंडूत नाबाद 121 केल्या.श्री विले पार्ले केळवाणी मंडळ व धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने एस. व्ही. के. एम. टी-20 महिला चॅम्पियन्स ट्रॉफी–2022 च्या सामन्यांमध्ये खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली असून देशभरातील 20 महिला संघातील खेळाडू उत्कृष्ट खेळांचे प्रदर्शन करित आहेत.

धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशन उपाध्यक्ष तथा श्री विले पार्ले केळवाणी मंडळ सह-अध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली 1 जून ते 8 जून या कालावधीत सुरु झालेल्या स्पर्धेचे सुरेख नियोजन सुरु आहे. भारतातून गोवा, कलकत्ता पश्चिम बंगाल, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, दिल्ली, तेलंगणा, हैद्राबाद, हरियाणा, छत्तिसगड आदि अनेक राज्यांतील खेळाडू या 20 संघांमध्ये समाविष्ट होवून शिरपूर येथे सुंदर खेळाचे प्रदर्शन केले.