
अमळनेर प्रभाग क्रमांक ६ मध्ये उघड्या गटारींचा विळखा; नागरिकांच्या निवेदनानंतरही कारवाईला ‘खो’
अमळनेर : विक्की जाधव.
शहरातील प्रभाग क्रमांक ६ मधील मिलचाळ, मुठ्ठे चाळ, जिन चाळ आणि सोनार चाळ परिसरात अनेक ठिकाणी उघड्या गटारी व साचलेल्या घाण-कचऱ्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. गटारी उघड्या असल्याने परिसरात डास-मच्छरांचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव वाढला असून, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. परिसरातील घाण-कचरा तातडीने उचलावा तसेच डास प्रतिबंधक फवारणी करावी, अशी मागणी करणारे निवेदन नागरिकांनी काही दिवसांपूर्वी नगरपालिका प्रशासनाकडे दिले होते.
मात्र, निवेदन देऊनही अद्याप अपेक्षित कार्यवाही झालेली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. एकीकडे शहरात स्वच्छतेबाबत विविध उपाययोजना केल्या जात असल्याचे सांगितले जात असताना, प्रभाग क्रमांक ६ मधील या भागात मात्र उघड्या गटारी आणि अस्वच्छतेचा प्रश्न कायम असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे नगरपालिका प्रशासनाने तातडीने परिसराची पाहणी करून गटारींची स्वच्छता, कचरा उचलणे आणि डास प्रतिबंधक फवारणी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
या समस्येकडे संबंधित प्रभागातील नगरसेवकांनीही गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे नागरिकांनी बोलून दाखवले. “निवडणुकीच्या वेळी मते मागण्यासाठी प्रभागात येतात, मग नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडवण्यासाठी का येत नाहीत?” असा प्रश्नही काही नागरिकांनी उपस्थित केला. नागरिकांच्या तक्रारी केवळ कागदावर न राहता त्यावर प्रत्यक्षात कार्यवाही होते का, याकडे आता प्रभागातील रहिवाशांचे लक्ष लागले आहे.