अमळनेर नगर परिषदेच्या कार्यशाळेत ५० विद्यार्थ्यांनी साकारल्या गणेशमूर्ती; मुस्लिम विद्यार्थ्यांचाही उत्स्फूर्त सहभाग.
अमळनेर : विक्की जाधव.
खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप हायस्कूल येथे अमळनेर नगर परिषदेच्या वतीने शाडू मातीपासून गणपती मूर्ती निर्मिती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यशाळेच्या सुरुवातीला नगर परिषदेच्या वतीने विद्यार्थ्यांना शाडू माती उपलब्ध करून देण्यात आली. शाळेचे कला शिक्षक डी. एन. पालवे यांनी विद्यार्थ्यांना शाडू मातीपासून गणपतीची मूर्ती तयार करण्याची पद्धत, मूर्तीचे प्रमाण व आकार याबाबत प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले.
या उपक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे शाळेतील मुस्लिम विद्यार्थ्यांनीही मोठ्या उत्साहाने सहभाग घेत गणपतीच्या मूर्ती साकारल्या. कला आणि पर्यावरण संवर्धनाच्या माध्यमातून सामाजिक सलोख्याचा संदेश देणारा हा उपक्रम ठरला.
शाळेतील सुमारे ५० विद्यार्थ्यांनी गणपतीच्या मूर्ती तयार केल्या. विद्यार्थ्यांसोबत शिक्षक सचिन अहिरे, जयश्री पाटील व नम्रता दोरकर यांनीही मूर्ती निर्मितीत सहभाग घेतला. तयार केलेल्या मूर्तींना दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांनी रंगकाम करून आकर्षक स्वरूप दिले.
या कार्यशाळेला शाळेचे चेअरमन नीरज अग्रवाल यांचे सहकार्य लाभले. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्तींची स्थापना विद्यार्थ्यांनी आपल्या घरी केली आहे. उत्कृष्ट गणेशमूर्ती साकारलेल्या विद्यार्थ्यांचे प्रोत्साहन वाढावे यासाठी शाळेचे मुख्याध्यापक ए. डी. भदाणे यांनी उत्कृष्ट मूर्ती बनविणाऱ्या विद्यार्थ्यांना रोख स्वरूपात बक्षिसे देऊन गौरविले.
शाडू मातीचा वापर, विद्यार्थ्यांचा सहभाग आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश यामुळे प्रताप हायस्कूलमधील हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी कलाशिक्षणासोबतच पर्यावरण व सामाजिक एकतेचा अनुभव देणारा ठरला.