दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर, आदिवासी व वंचितांच्या न्याय हक्कांसाठी लोकसंघर्ष मोर्चा आक्रमक; मुख्यमंत्र्यांना २२ विषयांचे निवेदन!
अमळनेर : विक्की जाधव.
तालुक्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर, आदिवासी आणि वंचित घटकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी लोकसंघर्ष मोर्चाने आता राज्यव्यापी आंदोलनाची भूमिका घेतली आहे. या घटकांच्या न्याय्य हक्कांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून अमळनेर तहसीलदार डॉ. उमा ढेकळे यांच्याकडे विविध २२ महत्त्वाच्या विषयांचे निवेदन सादर करण्यात आले. दुष्काळाच्या झळा सहन करणाऱ्या ग्रामीण भागातील कष्टकरी जनतेच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्याचा या निवेदनामागील मुख्य उद्देश आहे.

शेतकरी, शेतमजूर, आदिवासी आणि वंचित समाजातील घटकांना भेडसावणाऱ्या प्रश्नांवर केवळ आश्वासनांऐवजी ठोस निर्णय आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी व्हावी, अशी अपेक्षा लोकसंघर्ष मोर्चाने व्यक्त केली आहे. विविध २२ विषयांचा समावेश असलेल्या या निवेदनातून ग्रामीण आणि वंचित घटकांच्या प्रश्नांची व्यापकता शासनासमोर मांडण्यात आली आहे. त्यामुळे आता शासन या मागण्यांची कितपत दखल घेते आणि संबंधित प्रश्नांवर कोणती ठोस पावले उचलते, याकडे तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
यावेळी लोकसंघर्ष मोर्चाचे पन्नालाल मावळे यांच्यासह निलाबाई भिल, आनंद पवार, शरद पाटील, शंकर भिल, गणेश माळी, राजेंद्र पारधी, मधुकर चव्हाण, गणेश पारधी, संजय बारेला, जयदेव पारधी, शांताराम पारधी, हेमंत दाभाडे, भुरा पारधी, धनराज पारधी आदी उपस्थित होते. दुष्काळग्रस्त आणि वंचित घटकांच्या प्रश्नांना न्याय मिळेपर्यंत हा आवाज शासनदरबारी बुलंद ठेवण्याचा निर्धार या निवेदनातून अधोरेखित झाला आहे.