करमाळा प्रतिनिधी (सागर गायकवाड):मराठी उद्योजकांना संघटित करून त्यांच्या व्यवसायवृद्धीला चालना देण्यासाठी आणि स्थानिक पातळीवर रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्यासाठी आज, २६ ऑक्टोबर २०२६ रोजी करमाळा येथे ‘विश्वमंगल बिझनेस फोरम’चा शानदार शुभारंभ करण्यात आला. विश्वमंगल मराठी फाउंडेशनच्या उद्योग विभागाचा एक भाग म्हणून या नव्या शाखेची सुरुवात करण्यात आली आहे.
या उद्घाटन प्रसंगी विश्वमंगल मराठी फाउंडेशन, करमाळाचे प्रमुख अजिंक्य पाटील उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनी करमाळ्यातील तरुण उद्योजकांना आणि स्थानिक व्यावसायिकांना या फोरमच्या माध्यमातून जागतिक स्तरावर पोहोचण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.आमदार सुभाष (बापू) देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात विस्तारत असलेल्या विश्वमंगल बिझनेस फोरमने आता करमाळ्यातही पाऊल ठेवले आहे.
नूतन कार्यकारिणीची निवड:
या शुभारंभ प्रसंगी करमाळा शाखेच्या कामकाजाला गती देण्यासाठी अध्यक्ष पदी दिग्विजय निंबाळकर, सचिव पदी पंकज सोळंकी तर खजिनदार पदी रमन परदेशी यांची घोषणा एकमताने करण्यात आली. या नूतन कार्यकारिणीची निवड जाहीर होताच उपस्थित व्यावसायिक आणि फोरमच्या सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले.
या फोरमच्या माध्यमातून करमाळ्यातील व्यापाऱ्यांना साप्ताहिक बिझनेस नेटवर्किंग, भांडवल उभारणीचे मार्गदर्शन आणि डिजिटल प्लॅटफॉर्मची मदत मिळणार आहे. असा संदेश माननीय आमदार सुभाष (बापू) देशमुख यांनी मोबाईल द्वारे दिला.
“लोकल टू ग्लोबल” हे ध्येय समोर ठेवून करमाळ्यातील उद्योजक आता एकत्रितपणे प्रगतीची नवी शिखरे सर करतील, असा विश्वास नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केला.
या फोरमच्या बैठकीला अजिंक्य पाटील,दीपक चव्हाण, दिग्विजय निंबाळकर, पंकज साळुंके,अमरजीत साळुंखे, सुभाष कांबळे,आकाश चिवटे व रमण परदेशी हे उपस्थित होते.