गोरगरिबांच्या दिवाळीचा गोडवा सरकारी निर्णयावर; आनंदाच्या शिध्याबाबत स्पष्टता नाहिचं ?
अमळनेर : विक्की जाधव.
दिवाळीचा सण जवळ येत असताना ‘आनंदाचा शिधा’ योजनेबाबत अद्याप अधिकृत निर्णय जाहीर झाला नसल्याने अमळनेर शहरासह तालुक्यातील रेशनकार्डधारकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. महागाईमुळे सर्वसामान्यांचे आर्थिक गणित बिघडले असताना दिवाळीच्या सणासाठी मिळणाऱ्या या सवलतीच्या शिध्याची लाभार्थ्यांना प्रतीक्षा आहे. यंदा आनंदाचा शिधा मिळणार की नाही, याबाबत शासनाकडून स्पष्टता नसल्याने गरीब कुटुंबांच्या दिवाळीच्या आनंदावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
यापूर्वी या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना साखर, खाद्यतेल, रवा, चणाडाळ, मैदा आणि पोहे अशा जीवनावश्यक वस्तूंचा संच सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिला जात होता. त्यामुळे हातावर पोट असणारे कामगार, अल्प उत्पन्न गटातील कुटुंबे आणि ग्रामीण भागातील नागरिकांना सणासुदीच्या काळात काहीसा आर्थिक दिलासा मिळत होता. मात्र, यंदाच्या वाटपाबाबत आवश्यक मंजुरी आणि निधीची तरतूद यासंदर्भात अद्याप अधिकृत घोषणा नसल्याचे वृत्त आहे. त्यामुळे योजना रखडली आहे की शासनाकडून निर्णयाची प्रक्रिया सुरू आहे, याबाबत नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे.
आनंदाचा शिधा योजना बंद झाल्याची अधिकृत घोषणा नसताना ती बंद झाल्याचे गृहीत धरणे योग्य ठरणार नाही. मात्र, दिवाळीच्या तोंडावर लाभार्थ्यांचा संभ्रम दूर करण्यासाठी शासनाने तातडीने स्पष्ट भूमिका जाहीर करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. अमळनेर शहर आणि तालुक्यातील पात्र रेशनकार्डधारकांना यंदा आनंदाचा शिधा मिळणार का, त्यासाठी निधी मंजूर होणार का आणि वाटप कधी सुरू होणार, या प्रश्नांची उत्तरे आता शासनाच्या निर्णयातूनच मिळणार आहेत