वैद्यकीय रजा घेऊन करायचा गांजाची तस्करी, पुणे वाहतूक शाखेतील पोलिस कॉन्स्टेबलला तेलंगणात अटक
मार्मिक न्यूज नेटवर्क : पुणे
पुणे शहर वाहतूक शाखेतील पोलीस अंमलदार नितीन ज्ञानू शिंदे याला तेलंगणामध्ये 12 किलो गांजाची आंतरराज्य तस्करी करताना रंगेहात अटक करण्यात आली आहे. या धक्कादायक प्रकारानंतर पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शिंदे याला सेवेतून तातडीने निलंबित केले असून, त्याला बडतर्फ करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
प्रसार माध्यमांतील वृत्तानुसार, अटक करण्यात आलेला पोलीस कॉन्स्टेबल नितीन शिंदे हा गेल्या दीड वर्षांपासून पुण्यातील विश्रामबाग वाहतूक विभागात कार्यरत होता. नितीन शिंदे याने 7 ऑक्टोबर (काही अहवालांनुसार 5 ऑक्टोबर) पासून वैद्यकीय रजा घेतली होती. या रजेच्या काळात तो थेट ओडिशामध्ये गेला. ओडिशातून त्याने गांजाची खेप खरेदी केली. ओडिशातून हा गांजा महाराष्ट्रात आणण्यासाठी त्याने रेल्वे मार्गाची निवड केली होती. ओडिशातून रेल्वेने प्रवास करत असताना, तेलंगणातील वारंगल जिल्ह्यातील नेक्कोंडा रेल्वे स्थानक परिसराजवळ तो रविवारी 25 ऑक्टोबर रोजी उतरला.
तेथे संशयास्पद हालचालींमुळे स्थानिक पोलिसांनी त्याला पकडले. त्याच्या बॅगेची झडती घेतली असता, त्यामध्ये 12 किलो कोरडा गांजा आढळून आला. या गांजाची किंमत सुमारे 6 लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. यासोबतच तीन मोबाईल फोनही जप्त करण्यात आले आहेत. जप्त केलेला गांजा तेलंगणामार्गे महाराष्ट्रात (पुण्यात) आणून तो वेगवेगळ्या ड्रग पेडलर्सना सप्लाय करण्याची त्याची मुख्य योजना होती.
या प्रकरणी तेलंगणातील नेक्कोंडा पोलीस ठाण्यात अमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तेलंगणा पोलिसांनी नितीन शिंदे जवळील 3 मोबाईल फोन जप्त केले आहेत. या मोबाईल मधील कॉल डिटेल्स रेकॉर्ड्स आणि व्हॉट्सअॅप चॅट्सवरून तो ओडिशात कोणाच्या संपर्कात होता आणि महाराष्ट्रात हा गांजा कोणाला विकणार होता, या नेटवर्कचा शोध घेतला जात आहे.
पोलीस ओळखपत्राचा गैरवापर करून किंवा खाकी वर्दीच्या आडून त्याने यापूर्वीही अशी तस्करी केली आहे का, तसेच या आंतरराज्य रॅकेटमध्ये पुणे पोलीस दलातील किंवा इतर राज्यातील इतर कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास वारंगल पोलीस करत आहेत.
तेलंगणा पोलिसांच्या कारवाईनंतर पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केवळ निलंबनाची कारवाई केली नसून, पुण्यात शिंदेचे काय कनेक्शन होते याचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांचे एक पथकही माहिती गोळा करत आहे. या धक्कादायक प्रकारानंतर पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शिंदे याला सेवेतून तातडीने निलंबित केले असून, त्याला बडतर्फ करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. तर तेलंगणा पोलीस या आंतरराज्य तस्करीच्या रॅकेटचा अधिक तपास करत आहेत.
अटक केल्यानंतर तेलंगणा पोलिसांनी त्याला स्थानिक न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे. या आंतरराज्य रॅकेटची पाळेमुळे शोधण्यासाठी तेलंगणा पोलीस नितीन शिंदेची अधिक चौकशी करण्यासाठी त्याला पुन्हा पोलीस कोठडीत घेण्यासाठी न्यायालयात अर्ज करण्याची शक्यता आहे.