चाळीसगाव कृषि उत्पन्न बाजार समितीचा ऐतिहासिक निर्णय: २ नोव्हेंबरपासून कमिशन एजंटशिवाय थेट ‘शेतकरी ते खरेदीदार’ लिलाव पद्धत सुरू
मार्मिक न्यूज नेटवर्क : चाळीसगाव
शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि त्यांना त्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळवून देण्यासाठी चाळीसगाव कृषि उत्पन्न बाजार समितीने एक अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांच्या धर्तीवर आता चाळीसगाव बाजार समितीतही दिनांक ०२ नोव्हेंबर २०२६ पासून कमिशन एजंट (अडते) मार्फत लिलाव न करता थेट ‘शेतकरी ते खरेदीदार’ अशा पद्धतीने सर्व अन्नधान्याचे लिलाव केले जाणार आहेत.
तालुक्याचे लोकप्रिय आमदार दादाश्री.मंगेश चव्हाण, बाजार समितीचे सभापती श्री. किशोर भिकनराव पाटील, उपसभापती आणि सर्व संचालक मंडळाने एकत्रित येऊन हा क्रांतीकारी निर्णय घेतला आहे. या नवीन पद्धतीचे परिपत्रक आमदार मा.श्री. मंगेशदादा चव्हाण व बाजार समिती चे सभापती किशोर पाटील यांचे हस्ते खरेदीदार संघटनेचे अध्यक्ष संजय येवले, निलेश वाणी, खरेदीदार संघटनेचे पदाधिकारी व व्यापारी बांधवांना सुपूर्द करण्यात आले आहे. या ऐतिहासिक निर्णयाचे सविस्तर स्वरूप आणि महत्त्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे आहेत: थेट लिलाव पद्धत: दिनांक ०२/११/ २०२६ पासून बाजार समितीत येणाऱ्या सर्व अन्नधान्याचे लिलाव कमिशन एजंटशिवाय थेट शेतकरी आणि खरेदीदार (व्यापारी) यांच्यात होतील. यामुळे मध्यस्थांची साखळी मोडीत निघेल.
त्याच दिवशी रोख पेमेंट: सर्व शेतकरी बांधवांना लिलाव प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर खरेदीदार व्यापाऱ्यांकडून त्याच दिवशी त्यांच्या शेतमालाची हक्काची रक्कम (पेमेंट) अदा केली जाईल. शेतकऱ्यांनी आपला शेतमाल विकल्यानंतर आपली रोख रक्कम घेऊनच जावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
खर्च कमी होऊन शेतकऱ्यांना मिळणार जास्तीचा भाव: सभापती किशोर पाटील या निर्णयाबाबत माहिती देताना बाजार समितीचे सभापती श्री. किशोर भिकनराव पाटील यांनी सांगितले की, “या नवीन पद्धतीमुळे व्यापारी बांधवांना लागणारा अतिरिक्त खर्च कमी होणार आहे. याचा थेट फायदा शेतकरी बांधवांना होईल आणि त्यांच्या शेतमालाला पूर्वीपेक्षा अधिक आणि जास्तीचा भाव मिळू शकेल. तालुक्यातील सर्व अनुज्ञप्तीधारक (लायसन्सधारक) व्यापाऱ्यांनी २ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या या लिलाव पद्धतीत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, अशी विनंतीही त्यांनी केली. अडचणींवर चर्चेतून मार्ग काढू: आमदार मंगेश दादा चव्हाण या ऐतिहासिक निर्णयाची अंमलबजावणी करताना सुरुवातीला काही तांत्रिक किंवा व्यावहारिक अडचणी आल्यास, त्या सर्व व्यापारी आणि घटकांशी चर्चा करून सामोपचाराने सोडवल्या जातील, अशी ग्वाही आमदार दादाश्री. मंगेश चव्हाण यांनी दिली आहे. तसेच सर्व शेतकरी बांधवांनी बाजार समितीच्या या नवीन आणि पारदर्शक पद्धतीला पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. बाजार समितीच्या या निर्णयामुळे चाळीसगाव तालुक्यातील शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण असून, हा निर्णय शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.