अंबऋषी महाराज टेकडीवरील आगीच्या प्रकारांची पोलिसांकडून तातडीने दखल; पीआय दत्तात्रय निकम यांच्याकडून चौकशी
अमळनेर : विक्की जाधव.
शहरालगत असलेल्या अंबऋषी महाराज टेकडी परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून वारंवार आग लावण्याचे प्रकार समोर येत असल्याने पर्यावरणप्रेमींमध्ये चिंता व्यक्त होत आहे. या गंभीर प्रकाराची दखल घेत अंबऋषी महाराज टेकडी ग्रुपच्या वतीने काल दुपारी दोन वाजता पोलिसांकडे तक्रार देण्यात आली होती. त्यानंतर आज दुपारी बारा वाजता पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी तातडीने चौकशी सुरू करून या प्रकरणाची दखल घेतली.
अंबऋषी महाराज टेकडी ग्रुप गेल्या अनेक वर्षांपासून पर्यावरण संवर्धनासाठी सातत्याने काम करत आहे. परिसरातील लहान-मोठी झाडे जगवणे, हिरवाई टिकवणे आणि निसर्गाचे संरक्षण करणे यासाठी ग्रुपचे सदस्य मेहनत घेत आहेत. मात्र, वारंवार आग लावण्याचे प्रकार घडत असल्यास या प्रयत्नांना मोठा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे टेकडी परिसरातील वनसंपदा आणि पर्यावरणाचे नुकसान टाळण्यासाठी अशा प्रकारांना आळा घालणे गरजेचे आहे.
निसर्गाचे रक्षण करणे ही केवळ एका ग्रुपची नव्हे, तर संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे. टेकडीवरील झाडे ही शहराची नैसर्गिक संपत्ती असून त्यांचे संरक्षण करणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. पोलिसांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेतल्याने पुढील चौकशीत आगीच्या घटनांमागील कारण स्पष्ट होऊन, जाणीवपूर्वक आग लावली जात असल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधितांवर योग्य ती कारवाई होईल, अशी अपेक्षा अंबऋषी महाराज टेकडी ग्रुपकडून व्यक्त होत आहे.