अमळनेरच्या मुख्य प्रवेशद्वाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ नाव देण्याची मागणी.
अमळनेर : विक्की जाधव.
शहरातील धुळे रोडवरील मुख्य प्रवेशद्वाराला रयतेचे राजे, स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी अमळनेर तालुक्यातील शिवप्रेमी नागरिकांनी केली आहे. यासंदर्भात २७ ऑक्टोबर २०२६ रोजी अमळनेर नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. यापूर्वीही २६ मे २०२६ आणि २४ सप्टेंबर २०२६ रोजी याबाबत निवेदने देण्यात आल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे, तर संपूर्ण देशाचे आराध्य दैवत असून त्यांचे स्वराज्य स्थापनेचे कार्य, पराक्रमी इतिहास आणि रयतेच्या हिताला प्राधान्य देणारे विचार आजही समाजाला प्रेरणा देतात. अमळनेर शहराच्या मुख्य प्रवेशद्वाराला महाराजांचे नाव दिल्यास शहराच्या वैभवात भर पडेल. तसेच शहरात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक नागरिकाला आणि नव्या पिढीला महाराजांच्या विचारांची व कार्याची आठवण होईल, अशी भावना निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे.
अमळनेर नगरपरिषदेच्या २९ ऑक्टोबर २०२६ रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत हा विषय मांडून ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ असे अधिकृत नामकरण करण्याची घोषणा करावी, अशी विनंती शिवप्रेमी नागरिकांनी केली आहे. आता नगरपरिषद प्रशासन या मागणीची दखल घेऊन सकारात्मक निर्णय घेते का, याकडे अमळनेरमधील शिवप्रेमींचे लक्ष लागले आहे.