मारवड पोलिसांच्या सरकारी कामात अडथळा आणणाऱ्या आरोपीला शिक्षा; दोन महिने कारावास आणि एक हजारांचा दंड
अमळनेर : विक्की जाधव.
मारवड पोलिसांच्या सरकारी कामात अडथळा निर्माण करून पोलिसांशी हुज्जत घालणे आणि शासकीय कामकाजात अडथळा आणणे आरोपीला चांगलेच महागात पडले आहे. या प्रकरणात धुळे जिल्ह्यातील वालखेडा, ता. शिंदखेडा येथील प्रदीप आनंदा शिरसाठ (वय २९) याला न्यायालयाने दोन महिने कारावास आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. मारवड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १७३/२०२३ अन्वये भारतीय दंड विधानाच्या कलम ३५३, ३२३, ५०४ व ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. अमळनेर तालुक्यातील मुडी प्र. डांगरी येथे गायमाता मंदिराच्या यात्रेनिमित्त आयोजित लोकनाट्य व यात्रेदरम्यान बंदोबस्ताचे कर्तव्य बजावत असताना आरोपीने पोलिसांच्या सरकारी कामात अडथळा निर्माण केला होता. तसेच फिर्यादीला धक्काबुक्की करून शिवीगाळ व धमकी दिल्याचा आरोप होता.
या खटल्याची सुनावणी मा. न्यायाधीश सदर खटला कामी मा. जिल्हा न्यायाधीश-२ श्रीमती एम. के. एस. कोचर मॅडम यांच्या न्यायालयात झाली. खटल्यादरम्यान सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील ॲड. के. आर. बागुल यांनी प्रभावी बाजू मांडली. त्यांनी एकूण पाच साक्षीदारांची तपासणी केली. फिर्यादी, साक्षीदार, पोलीस पाटील तसेच घटनास्थळी उपस्थित असलेल्या इतर सहकाऱ्यांची साक्ष आणि परिस्थितिजन्य पुरावे न्यायालयासमोर मांडण्यात आले. या पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने आरोपी प्रदीप आनंदा शिरसाठ याला भारतीय दंड विधानाच्या कलम ३५३ अंतर्गत दोन महिने कारावास व एक हजार रुपये दंड, तर कलम ३३२ अंतर्गत तीन महिने कारावास व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या प्रकरणात मारवड पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस कर्मचारी भरत श्रीराम ईशी, अमळनेर पोलीस ठाण्याचे केसवॉच कर्मचारी, पैरवी अधिकारी पोहेकॉ. पुरुषोत्तम वाळदे, पैरवी अधिकारी पी. एस. आय. उदयसिंग सांळुके, पारोळा पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी राहुल रणधीर, चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोहेकॉ. प्रमोद पाटील तसेच जी.पी.एस.आय. दिलीप थोरेंनी सहकार्य केले.