राज्याबाहेर पळाले, पण पोलिसांच्या जाळ्यात अडकले!
हरियाणातून एकाला, तर पुण्यातून दुसऱ्याला अटक; सर्व्हे मशिन चोरीप्रकरणी तीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत
शिक्रापूर, प्रतिनिधी – वर्षा चव्हाण
डिंग्रजवाडी (ता. शिरूर) येथील कंपनीतून पाच लाख रुपये किमतीचे सर्व्हे मशिन चोरी करणाऱ्या दोघांना शिक्रापूर पोलिसांनी अटक केली आहे. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी एका आरोपीला हरियाणा राज्यातून, तर दुसऱ्याला पुण्यातील विश्रांतवाडी परिसरातून ताब्यात घेतले. या कारवाईत तीन लाख रुपये किमतीचा चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
डिंग्रजवाडी येथील इगवुड प्रा. लि. स्कॅलार स्पेसेस कंपनीतून जमीन मोजणीसाठी वापरण्यात येणारे पाच लाख रुपये किमतीचे सर्व्हे मशिन चोरीला गेले होते. याप्रकरणी संग्राम शामराव मोरे (वय ४४, रा. चिखली प्राधिकरण, चिंचवड, पुणे) यांच्या फिर्यादीवरून शिक्रापूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३४(१), ३०५, ३१७(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास करताना पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी तपासी अधिकारी पोलीस हवालदार अजित इंगवले आणि गुन्हे शोध पथकाला तपासाच्या सूचना दिल्या. त्यानुसार पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवली. या तपासातून हरी किशन जाटो (वय २४, रा. जोधपूर, राजस्थान) याला हरियाणा राज्यातून, तर अफाकजुद्दीन मुंताजिमुद्दीन काझी (वय ३६, रा. खडकी) याला पुण्यातील विश्रांतवाडी परिसरातून ताब्यात घेण्यात आले.
चौकशीदरम्यान दोघांनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली. त्यांच्याकडून तीन लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या आरोपींनी अशाच प्रकारचे आणखी गुन्हे केले आहेत का, याचा तपास पोलीस करत आहेत.
ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदिपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार आणि शिरूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
या पथकात पोलीस उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर, पोलीस हवालदार अजित इंगवले, रोहिदास पारखे, अमोल दांडगे, शिवाजी चितारे, विश्वंभर वाघमारे, गणेश कुदळे तसेच पोलीस अंमलदार नारायण वाळके, राम जाधव, मच्छिंद्र निचीत, नागेश वाघमारे, भारत भोसले, ललित चकनारायण आणि मयूर कुंभार यांचा समावेश होता. पुढील तपास पोलीस हवालदार अजित इंगवले करीत आहेत.