करमाळा प्रतिनिधी:- करमाळा नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी सणानिमित्त एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. मोहिनी संजय सावंत व उपनगराध्यक्ष अतुल फंड व सर्व नगरसेवक यांच्या विशेष पुढाकारामुळे नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना यंदाच्या दिवाळी सणानिमित्त प्रत्येकी ५,००० रुपये सानुग्रह अनुदान (बोनस) वाटप करण्याचा निर्णय मंजूर करण्यात आला आहे. यामुळे नगरपरिषद कर्मचारी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून सर्व कर्मचाऱ्यांची दिवाळी खऱ्या अर्थाने गोड झाली आहे.

दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी नगराध्यक्षा सौ. मोहिनी सावंत व उपनगराध्यक्ष श्री. अतुल फंड यांची भेट घेऊन सानुग्रह अनुदान मिळावे, अशी आग्रही विनंती केली होती. कर्मचाऱ्यांच्या या मागणीची तत्काळ दखल घेत नगराध्यक्षा मोहिनी सावंत, उपनगराध्यक्ष अतुल फंड व सर्व नगरसेवक यांनी अत्यंत सकारात्मकता दाखवत प्रति कर्मचारी ५,००० रुपये सानुग्रह अनुदान मंजूर केले.
करमाळा नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड व्हावी यासाठी असा निर्णय घेतला गेला असल्याने कर्मचारी वर्गातून अत्यंत समाधान व्यक्त होत आहे. या निर्णयासाठी सर्व सन्माननीय नगरसेवक आणि मुख्याधिकारी सचिन तपसे यांनी विशेष सहकार्य केले.
दिवाळीचा सण आनंदात साजरा करण्याची संधी दिल्याबद्दल नगरपरिषदेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी नगराध्यक्षा मोहिनी सावंत, उपनगराध्यक्ष अतुल फंड, मुख्याधिकारी सचिन तपसे व सर्व नगरसेवकांचे मनापासून आभार मानले आहेत.