बेकायदा गर्भलिंग निदान आणि गर्भपात प्रकरणी दोन डाॅक्टरांसह तिघांना 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा..
मार्मिक न्यूज नेटवर्क : कोल्हापूर
कोल्हापूरमधील बेकायदा गर्भलिंग निदान आणि गर्भपात प्रकरणातील बहुचर्चित खटल्याचा 11 वर्षांनंतर निकाल लागला असून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाने दोन डाॅक्टरांसह तिघांना दोषी ठरवत 10 वर्षे सक्तमजुरी आणि 20 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. यामध्ये कोल्हापूरच्या आपटेनगर येथील एका महिला डाॅक्टरचा समावेश आहे.

प्रसार माध्यमांतील वृत्तानुसार, या प्रकरणात डाॅ. तानाजी पाटील, डाॅ. सारिका सावंत आणि पीडित महिलेचा पती प्रकाश कुंभार अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत. तर या प्रकरणात न्यायालयाने अन्य तीन संशयित आरोपी गजेंद्र कुसाळे, कैलास नोतान आणि सत्येन माळकर यांची निर्दोष मुक्तता केली आहे.

पन्हाळा तालुक्यातील मोहरे येथील पीडित महिलेला आधी एक मुलगी होती. पुन्हा मुलगी नको या मानसिकतेतून नोव्हेंबर 2015 मध्ये पोर्टेबल सोनोग्राफी मशीनद्वारे तिची बेकायदेशीर गर्भलिंग चाचणी करण्यात आली, ज्यामध्ये मुलगी असल्याचे निदान झाले. बेकायदा गर्भपात करत असताना पीडित महिलेची प्रकृती अत्यंत चिंताजनक बनली. त्यामुळे तिला कोल्हापुरातील राजारामपुरी येथील एका खासगी रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले.
खासगी रुग्णालयातील डाॅक्टरांनी शस्त्रक्रिया करून महिलेचे प्राण वाचवले, मात्र गर्भातील अर्भक वाचू शकले नाही. बेकायदा गर्भपाताचा हा प्रकार समोर आल्यानंतर रुग्णालयाने पोलिसांना कळवले आणि पीडितेच्या जबाबावरून कोडोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पन्हाळा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डाॅ. प्रवीण नाईक यांनी या प्रकरणात फिर्याद दिली होती. तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद मेमाने यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एम. पाटील यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी झाली. सरकारी वकील अमृता पाटोळे आणि अमित महाडेश्वर यांनी बाजू मांडली, ज्यामध्ये 12 साक्षीदार तपासण्यात आले.
समाजात असे गुन्हे वाढत असून बेकायदा गर्भपातामुळे महिलांचे आरोग्य आणि जीव धोक्यात येतो, त्यामुळे याकडे अत्यंत गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे, असे निरीक्षण निकाल देताना न्यायालयाने नोंदवले. न्यायालयाने तिन्ही मुख्य आरोपींना 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. हा निकाल पीसीपीएनडीटी कायद्यांतर्गत लागला आहे.