उजनीतील प्रस्तावित मासेमारी ठेक्याच्या विरोधात दुसऱ्या टप्प्यातील आंदोलन; उद्यापासून पुण्यात प्राणांतिक उपोषण

अपनी भाषा में पढ़े! Translate

उजनीतील प्रस्तावित मासेमारी ठेक्याच्या विरोधात दुसऱ्या टप्प्यातील आंदोलन; उद्यापासून पुण्यात प्राणांतिक उपोषण

(निलेश गायकवाड)

भिगवण (वार्ताहर) – उजनी जलाशयातील प्रस्तावित मासेमारी ठेका रद्द करण्याच्या मागणीसाठी स्थानिक पिढीजात व भूमिहीन धरणग्रस्त मच्छिमारांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. दुसऱ्या टप्प्यातील आंदोलनाला उद्या मंगळवार दि. १६ पासून सुरुवात होत असून, कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या पुणे कार्यालयाच्या आवारात प्राणांतिक उपोषण सुरू करण्यात येणार आहे.

उजनी मच्छिमार बचाव अभियानाच्या वतीने हे आंदोलन छेडण्यात येणार आहे.

आठ जणांचे प्राणांतिक उपोषण

या उपोषणात आठ मच्छिमार सहभागी होणार असून त्यामध्ये तीन महिला आणि पाच पुरुषांचा समावेश आहे. उपोषण काळात शेकडो मच्छिमार रोज पुण्यात पाठिंबा देण्यासाठी येणार आहेत. शासनाने वेळेत निर्णय घेतला नाही तर आंदोलनाची व्याप्ती आणखी वाढवण्यात येईल, असा इशारा संघटनेच्या वतीने चंद्रकांत भोई, बाळासाहेब काळे, दत्तात्रय व्यवहारे, बाळासाहेब गाडेकर, शरद गलांडे आदींनी दिला आहे.

उपोषणकर्त्यांची नावे – चंद्रकांत भोई, बलभीम भोई, अनिता नगरे, पोपट नगरे, नवनाथ परदेशी, संजय सल्ले, दीपाली डिरे, मंदा काळे.

हजारो कुटुंबांचा रोजगार धोक्यात

उजनी जलाशयातील मासेमारी व्यवसायावर हजारो मच्छिमार, आडतदार, व्यापारी, किरकोळ विक्रेते, जाळी व्यावसायिक, तोडाई कामगार, हॉटेल व्यावसायिक यांचा रोजगार आणि उदरनिर्वाह अवलंबून आहे. मात्र कृष्णा खोरे विकास महामंडळाने उजनीच्या मासेमारीच्या संपूर्ण साखळी पद्धतीवर स्वारस्य अभिव्यक्ती (EOI) अर्थात प्रस्तावित ठेका काढला आहे.

शासनाचे धोरण रोजगार निर्मितीचे असताना, इथे असलेला रोजगारच काढून मच्छिमारांना बेरोजगार करण्याचे धोरण आखल्याचा आरोप मच्छिमारांनी केला आहे. याच विरोधात गेल्या आठवड्यात ४५ गावांमध्ये एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले होते. त्यानंतर या प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे, मात्र ठेका पूर्णपणे रद्द झाला पाहिजे या मागणीसाठी हे प्राणांतिक उपोषण होत आहे.

भावनिक बॅनर चर्चेत

दरम्यान, मच्छिमारांनी या विरोधात लावलेला एक भावनिक आणि उपरोधिक बॅनर सध्या चर्चेत आला आहे.

> “मायबाप सरकार… आमची उन्हातान्हातील, थंडी-पावसातील कष्टाची, श्रमाची भाकर-कालवण पण तुम्हाला पुरेना व्हय? आपण फार भुकेलेला दिसत आहात व्ह… असू द्या, आम्ही पण घासातला घास देणारे आहोत… आमची एकच माफक अपेक्षा… आम्हाला भाकरी व रोजगार द्या, मुलांच्या शिक्षणाचं बघा… आणि बिनधास्त ठेका काढा… आपण तर रोजगाराच्या वल्गना करता आणि इथे उपलब्ध असणारा रोजगार काढता? प्रजेने आता जायचे तरी कुठे? नाहीच काही देता आलं तर अंत्यसंस्कारासाठी जळण (लाकूड) तरी तयार ठेवा…”

अशा आशयाचा हा बॅनर लक्षवेधी ठरत असून सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!