बारामती बस स्थानकावरील सुरक्षा रक्षकांचे कौतुक; चोख बंदोबस्तामुळे चोरी-लुटमारीला आळा
(निलेश गायकवाड) दि. 13 सप्टेंबर 2026
बारामती – बारामती बस स्थानकावरील सुरक्षा रक्षकांच्या सतर्कतेमुळे आणि चोख बंदोबस्तामुळे बस स्थानक परिसरातील चोऱ्या आणि लुटमारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. त्यांच्या या कामगिरीमुळे सर्वसामान्य प्रवाशांमधून त्यांचे कौतुक होत आहे.
बस स्थानक हे कायम गजबजलेले असते. गर्दीचा फायदा घेऊन चोरटे प्रवाशांचे पाकीट, मोबाईल, बॅगा चोरायचे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून येथील सुरक्षा रक्षकांनी कडक पहारा सुरू केला आहे. प्रत्येक बारीक हालचालीवर लक्ष ठेवले जात असल्याने चोऱ्यांचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी झाले आहे.
नागरिकांमध्ये जनजागृती
फक्त बंदोबस्तच नाही, तर प्रवाशांना सतर्क करण्याचे कामही हे सुरक्षा रक्षक करत आहेत. “आपल्या सामानाची काळजी घ्या, अनोळखी व्यक्तीपासून सावध रहा” अशा प्रकारची माहिती ते प्रवाशांना देत आहेत. त्यामुळे नागरिक देखील अधिक सावधान आणि सतर्क झाले आहेत.
गणेशोत्सवासाठी विशेष नियोजन
येणाऱ्या गणेशोत्सव काळात बस स्थानकावर प्रचंड गर्दी होणार आहे. या पार्श्वभूमीवर सुरक्षा रक्षकांनी विशेष नियोजन केले आहे. गर्दीवर नियंत्रण ठेवणे, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देणे, यावर त्यांचे पूर्ण लक्ष असणार असल्याची माहिती सुरक्षा विभागाकडून देण्यात आली आहे.
बारामतीकर प्रवाशांनी या सुरक्षा रक्षकांच्या कामाचे मनापासून आभार मानले आहेत.