भिगवणमध्ये गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दंगा काबू सराव व रूट मार्च; पोलीस यंत्रणा सज्ज
(निलेश गायकवाड)
भिगवण (ता. इंदापूर) – गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी भिगवण पोलीसांनी कंबर कसली आहे. याच अनुषंगाने भिगवण पोलीस स्टेशन हद्दीत दंगा काबू सराव आणि रूट मार्च घेण्यात आला.
दंगा काबू सराव संपन्न
आपत्कालीन प्रसंगात परिस्थिती हाताळण्यासाठी दिनांक १२/०९/२०२६ रोजी सकाळी ११.०० ते ११.५० या दरम्यान पोलीस ठाण्यात दंगा काबू योजनेचा सराव घेण्यात आला. या सरावात पोलीस ठाणे नेमणुकीचे ५ अधिकारी व २२ पुरुष/महिला अंमलदार यांनी सहभाग घेतला होता.
बाजारपेठेत रूट मार्च
त्याचप्रमाणे गणेशोत्सवामध्ये नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी, सामाजिक सलोखा आणि सार्वजनिक शांतता राहावी यासाठी दुपारी १३.०० ते १४.०५ या कालावधीत भिगवण बाजारपेठ परिसरात रूट मार्च काढण्यात आला.
सदर रूट मार्चमध्ये ०५ पोलीस अधिकारी, २२ पोलीस महिला/पुरुष अंमलदार तसेच आरसीपीचे १ अधिकारी व ९ अंमलदार असे एकूण ६ अधिकारी व ३१ अंमलदार सहभागी झाले होते.
रूट मार्च दरम्यान भिगवण मुख्य बाजारपेठ, उत्सवाच्या अनुषंगाने संवेदनशील ठिकाणे, मशिद, मिश्र वस्ती, प्रमुख चौक यासह मिरवणूक मार्गाची पाहणी करण्यात आली.
आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क व तत्पर असल्याचा संदेश या रूट मार्चमधून नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात आला.
– सोमनाथ शेंडगे, सहा. पोलीस निरीक्षक, भिगवण पोलीस स्टेशन