पावसाच्या तडाख्यात गणेशमूर्ती विक्रेत्यांचे नुकसान; नगरपालिकेच्या सुविधांचा बोजवारा!

अपनी भाषा में पढ़े! Translate

IMG-20260913-WA0781

पावसाच्या तडाख्यात गणेशमूर्ती विक्रेत्यांचे नुकसान; नगरपालिकेच्या सुविधांचा बोजवारा!

 

अमळनेर : विक्की जाधव.

अनेक दिवसांपासून दांडी मारलेल्या पावसाने अमळनेर शहरात कालपासून जोरदार हजेरी लावली असून, या पावसाचा मोठा फटका गणेशमूर्ती विक्रेत्यांना बसला आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध ठिकाणी मूर्ती विक्रीसाठी दुकाने थाटण्यात आली आहेत. मात्र अचानक आलेल्या जोरदार पावसामुळे मूर्तींचे नुकसान होण्याबरोबरच विक्रेत्यांचीही मोठी आर्थिक अडचण निर्माण झाली आहे. तर या परिसरात मोठा चिखल देखील झाला असून येणाऱ्या जाणाऱ्यांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

IMG-20260913-WA0782

पाच पावली मंदिरासमोरील नगरपालिकेच्या शाळेच्या परिसरात गणेशमूर्ती विक्रीसाठी दुकान लावणाऱ्या विक्रेत्यांकडून जागेच्या बदल्यात सुमारे ५०० रुपये शुल्क वसूल केले जात असल्याची माहिती समोर आली आहे. शुल्क आकारले जात असताना विक्रेत्यांना तसेच नागरिकांना ये-जा करण्यासाठी आवश्यक सुविधा, पावसापासून संरक्षणाची व्यवस्था आणि परिसरातील मूलभूत सोयी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी नगरपालिकेची आहे. मात्र प्रत्यक्षात या ठिकाणी सुविधांचा अभाव असल्याचे चित्र दिसून येत आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत नागरिकांनी गणपती विसर्जन मार्गावरील खड्ड्यांचा मुद्दा नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांसमोर उपस्थित केला होता.

त्यावेळी मुख्याधिकारी गणेश शिंदे यांच्या कडून विसर्जन मार्ग खड्डेमुक्त करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र गणेशोत्सवाला सुरुवात होऊनही विसर्जन मार्गावरील अनेक ठिकाणी खड्डे कायम असल्याने आश्वासनाची अंमलबजावणी कुठे झाली? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

गणेशोत्सवाच्या काळात हजारो नागरिक आणि विविध गणेश मंडळांचे कार्यकर्ते या मार्गावरून ये-जा करणार आहेत. त्यातच पावसामुळे रस्त्यांची अवस्था आणखी बिकट होत असताना नगरपालिकेने वेळीच उपाययोजना न केल्यास नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागू शकते. शुल्क वसुली होते, आश्वासने दिली जातात; मग सुविधा देण्याची वेळ आली की नगरपालिका नेमकी कुठे गायब होते? असा संतप्त प्रश्न आता नागरिक आणि गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांकडून उपस्थित होत असून, प्रशासनाने तातडीने खड्डे बुजवून गणेशमूर्ती विक्रेत्यांसाठी व नागरिकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!