अमळनेरात पाच घरफोड्या; बंद घरे हेरून चोरट्यांचा धुमाकूळ पोलिसांना मोठे आव्हान..
अमळनेर : विक्की जाधव.
शहरातील बंद घरे चोरट्यांच्या रडारवर आली असून, मुंदडा नगरमधील अथर्व बंगलोज व वामन नगर परिसरात एकाच रात्री तब्बल पाच घरफोड्या झाल्याने खळबळ उडाली आहे. १२ सप्टेंबरच्या रात्री घडलेल्या या घटनांमध्ये सुमारे ७० हजार २०० रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने व रोकड लंपास झाल्याची माहिती आहे. गणेश रामभाऊ पाटील हे कुटुंबासह रात्री साडेआठच्या सुमारास घराला कुलूप लावून म्हसले येथे गेले होते. दुसऱ्या दिवशी परतल्यानंतर लोखंडी गेट उघडे, घराचे कुलूप तुटलेले तसेच कपाट व लॉकर फोडल्याचे आढळून आले. त्यांच्या घरातून १३ ग्रॅमची सोन्याची माळ, १२ ग्रॅमची सोन्याची माळ असा सुमारे ५० हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेला. शेजारील अनिल आत्माराम महाजन यांचेही बंद घर फोडून चोरट्यांनी ८ ग्रॅम सोन्याची चेन, चांदीचे देव व जोडवे असा ऐवज लंपास केला.
दरम्यान, पिंपळे रस्त्यावरील वामन नगर परिसरात प्रा. लोहार यांच्या घरातून १५ ग्रॅम चांदीचे शिक्के आणि सुमारे १० ते १५ हजार रुपये रोख चोरीस गेल्याची माहिती आहे. मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेले पी. आर. सूर्यवंशी व व्ही. डी. पाटील यांचीही बंद घरे चोरट्यांनी फोडली; मात्र घरात मौल्यवान वस्तू नसल्याने तेथे चोरीचा माल मिळाला नाही. विशेष म्हणजे घरमालक बाहेरगावी असल्याची संधी साधून चोरट्यांनी कुलूप तोडत घरात प्रवेश केल्याचे घटनांवरून दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, बंद घरांकडे लक्ष ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे.
गणेश पाटील यांच्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३१(३), ३३१(४) व ३०५(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक शरद काकळीज तपास करीत आहेत. पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, पोलीस उपनिरीक्षक शरद काकळीज तसेच डी.बी. पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून फॉरेन्सिक पथकानेही नमुने घेतले आहेत. एकाच रात्री पाच बंद घरे फोडल्याने शहरातील सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, चोरट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी रात्रीची गस्त वाढवावी आणि संवेदनशील भागात पोलिसांची नियमित पेट्रोलिंग वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.