भिगवण मच्छी मार्केटमध्ये स्वच्छतेचे तीनतेरा; दुर्गंधीने नागरिक हैराण, बाजार समितीचे दुर्लक्ष
(निलेश गायकवाड)
भिगवण (ता. इंदापूर) – कृषी उत्पन्न बाजार समिती इंदापूर संचलित उपबाजार असलेल्या भिगवण येथील रिटेल मत्स्य बाजार (मच्छी मार्केट) मध्ये स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. सर्वत्र घाण, दुर्गंधी आणि अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले असून, बाजार समिती प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिक आणि मच्छी विक्रेत्यांकडून होत आहे.
दुर्गंधी आणि रोगराईचा धोका
भिगवण मच्छी मार्केट हे भिगवणसह परिसरातील मच्छी प्रेमींसाठी मुख्य बाजार आहे. मात्र, गेल्या अनेक महिन्यांपासून येथे कोणत्याही प्रकारची स्वच्छता केली जात नाही. माशांचे टाकाऊ पदार्थ, सांडपाणी जागेवरच पडून राहत असल्याने परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. यामुळे येथे खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांना नाक दाबून उभे राहावे लागत आहे.
सर्वात गंभीर बाब म्हणजे येथे असलेले स्वच्छतागृह देखील अत्यंत घाणेरड्या अवस्थेत आहे. स्वच्छतागृहाची साफसफाईच होत नसल्याने महिला ग्राहक आणि विक्रेत्यांची मोठी गैरसोय होत आहे.
बाजार समितीचे सर्रास दुर्लक्ष
हा मच्छी मार्केट कृषी उत्पन्न बाजार समिती इंदापूर यांच्या अखत्यारीत येतो. लाखो रुपयांची उलाढाल या मार्केटमधून होते, बाजार फी वसूल केली जाते, मात्र सुविधांच्या नावाने बोंब आहे. पाणी, नाले सफाई, रोजची झाडू, कचरा उचलणे यापैकी काहीच केले जात नसल्याचे चित्र आहे.
येथील दयनीय अवस्थेमुळे रोगराई पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे.
नागरिकांची मागणी
भिगवण मच्छी मार्केटची तातडीने स्वच्छता करावी, नियमित पाणीपुरवठा आणि कचरा व्यवस्थापन करावे, स्वच्छतागृहाची दुरुस्ती करून ते वापरण्यायोग्य करावे, अशी जोरदार मागणी नागरिकांमधून होत आहे. बाजार समितीने याकडे तातडीने लक्ष न दिल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही व्यापारी वर्गातून दिला जात आहे.