जनगणना २०२७ साठी केंद्राचे निर्देश; ४० बाबींची माहिती घेतली जाणार

अपनी भाषा में पढ़े! Translate

WhatsApp Image 2026-09-09 at 8.37.08 PM

जनगणना २०२७ साठी केंद्राचे निर्देश; ४० बाबींची माहिती घेतली जाणार

नवी दिल्ली, प्रतिनिधी – वर्षा चव्हाण

भारताची आगामी जनगणना २०२७ अधिक व्यापक पद्धतीने घेण्यात येणार असून, यासाठी नागरिकांकडून विविध ४० बाबींवर माहिती संकलित केली जाणार आहे. निर्धारित कुटुंब पत्रकाद्वारे ही माहिती घेण्याचे निर्देश केंद्र शासनाने जनगणना अधिकाऱ्यांना दिले आहेत. जनगणना अधिनियम, १९४८ मधील कलम ८ च्या उपकलम (१) अन्वये हे निर्देश जारी करण्यात आले आहेत.

जनगणना अधिकारी आपल्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक कुटुंबाला भेट देऊन निर्धारित कुटुंब पत्रकातील प्रश्न विचारणार असून, त्यानुसार नागरिकांची माहिती नोंदविली जाणार आहे. या प्रक्रियेत प्रत्येक व्यक्तीशी संबंधित सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, कौटुंबिक तसेच स्थलांतराशी संबंधित माहिती संकलित केली जाणार आहे.

🔸व्यक्तीच्या वैयक्तिक माहितीची नोंद

जनगणनेदरम्यान व्यक्तीचे नाव, कुटुंबप्रमुखाशी असलेले नाते, लिंग, जन्मतारीख, वय, वैवाहिक स्थिती, विवाहाच्या वेळीचे वय, पती किंवा पत्नीचे नाव आणि घोषित राष्ट्रीयत्व याबाबत माहिती घेतली जाणार आहे. याशिवाय धर्म, अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती तसेच जात याचीही नोंद केली जाणार आहे.

🟣आई-वडिलांचा तपशील आणि दिव्यांगत्वाची माहिती

व्यक्तीच्या वडील व आईचा तपशील, तसेच दिव्यांगत्वाबाबतची माहितीही जनगणना प्रक्रियेत घेतली जाणार आहे. नागरिकांची मातृभाषा, इतर अवगत भाषा, साक्षरता आणि डिजिटल साक्षरतेची माहितीही नोंदविण्यात येणार आहे.

🔷शिक्षण आणि रोजगाराची माहिती

जनगणना २०२७ मध्ये नागरिकांच्या शैक्षणिक स्थितीलाही महत्त्व देण्यात आले आहे. व्यक्तीची शैक्षणिक स्थिती, उच्चतम शैक्षणिक स्तर आणि शिक्षणाची शाखा किंवा विषय याबाबत माहिती संकलित केली जाणार आहे.

त्याचबरोबर मागील वर्षातील कामाची स्थिती, आर्थिक कार्याची वर्गवारी, व्यक्तीचा व्यवसाय, उद्योग-व्यापार-सेवेचे स्वरूप आणि कामगारांचा प्रवर्ग याबाबतही माहिती घेतली जाणार आहे.

🔴कामाच्या शोधात असलेल्या व्यक्तींचीही नोंद

अंशकालीन किंवा निम-अंशकालीन काम करणाऱ्या व्यक्ती तसेच सध्या कोणतेही आर्थिक काम न करणाऱ्या व्यक्तींची माहितीही जनगणनेत नोंदविली जाणार आहे. अशा व्यक्तींकडून बिनआर्थिक कार्य, कामाच्या शोधात आहेत का किंवा काम करण्यासाठी उपलब्ध आहेत का, याबाबत माहिती घेतली जाणार आहे.

🟢प्रवास, जन्मठिकाण आणि स्थलांतराची माहिती

व्यक्तीच्या कामाच्या ठिकाणापर्यंतच्या प्रवासाची माहितीही संकलित केली जाणार आहे. त्यासोबत जन्मठिकाण, पूर्वीचे निवासस्थान, स्थलांतराचे कारण, शेवटच्या स्थलांतरानंतर गाव किंवा शहरात वास्तव्याचा कालावधी आणि कायमस्वरूपी निवासाचा पत्ता याची नोंद केली जाणार आहे.

🟤महिलांबाबत विशेष माहिती

सध्या विवाहित, विधवा, घटस्फोटित आणि विभक्त महिलांसाठी त्यांच्या अपत्यांबाबतची माहितीही घेतली जाणार आहे. यामध्ये सध्या हयात असलेल्या अपत्यांची संख्या आणि जीवित जन्म झालेल्या अपत्यांची संख्या विचारली जाणार आहे.

सध्या विवाहित महिलांसाठी मागील एक वर्षात जीवित जन्मलेल्या अपत्यांची संख्या याबाबतही स्वतंत्र माहिती संकलित केली जाणार आहे.

🔵आधार, मोबाइल आणि ओळखपत्रांची माहिती

जनगणना २०२७ मध्ये काही महत्त्वाच्या ओळख व सुविधांशी संबंधित माहितीचाही समावेश करण्यात आला आहे. नागरिकांकडून कोविड-१९ लसीकरणाचे ठिकाण, बँक खात्यांची एकूण संख्या, उपलब्ध असल्यास मोबाइल क्रमांक, आधार क्रमांक आणि मतदार ओळखपत्र क्रमांक याबाबत माहिती घेतली जाणार आहे.

भारतीय पासपोर्टधारक असल्यास पासपोर्ट क्रमांक तसेच वाहनचालक परवाना उपलब्ध आहे किंवा नाही, याचीही नोंद करण्यात येणार आहे.

🟡जनगणना अधिकाऱ्यांकडून माहिती संकलन

जनगणना अधिकारी नियुक्त केलेल्या स्थानिक क्षेत्राच्या हद्दीत राहणाऱ्या सर्व व्यक्तींकडून निर्धारित कुटुंब पत्रकानुसार माहिती संकलित करतील. जनगणनेच्या माध्यमातून देशातील लोकसंख्येबरोबरच नागरिकांची सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, रोजगार, स्थलांतर आणि कौटुंबिक स्थिती याबाबत व्यापक माहिती उपलब्ध होणार आहे.

भारताचे महारजिस्ट्रार व जनगणना आयुक्त मृत्युंजय कुमार नारायण यांनी जनगणना अधिनियम, १९४८ मधील तरतुदीनुसार यासंदर्भातील निर्देश जारी केले आहेत. त्यामुळे जनगणना २०२७ ही केवळ लोकसंख्या मोजणी न राहता देशातील नागरिकांच्या विविध सामाजिक व आर्थिक स्थितीचे व्यापक चित्र समोर आणणारी प्रक्रिया ठरणार आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!