शेतीशी असलेले नाते मृत्यूनंतरही कायम; भद्रा प्रतीक उद्योग समूहाच्या प्रवर्तक संचालिका प्रमिलाताईंच्या स्मृतींना पर्यावरणपूरक मानवंदना
अमळनेर : विक्की जाधव.
श्री भद्रा प्रतीक उद्योग समूहाच्या प्रवर्तक संचालिका स्वर्गीय सौ. प्रमिलाताई सुरेश साळी यांचे ३ सप्टेंबर रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने साळी परिवारासह नातेवाईक, मित्रपरिवार आणि परिचितांमध्ये शोककळा पसरली. मात्र, त्यांच्या अस्थीविसर्जन व रक्षाविसर्जनाचा पारंपरिक पद्धतीपेक्षा वेगळा आणि पर्यावरणपूरक निर्णय घेत त्यांच्या स्मृतींना अनोखी मानवंदना देण्यात आली.
स्वर्गीय प्रमिलाताईंना शेती आणि निसर्गाची विशेष आवड होती. लहानपणीपासूनच त्यांनी आपल्या वडिलांच्या शेतात काबाडकष्ट करत शेतीची कामे केली. उन्हातान्हात मेहनत घेत त्यांनी शेती फुलवली, हिरवाई जपली आणि निसर्गाशी असलेले आपले नाते आयुष्यभर टिकवून ठेवले. शेतीत काम करण्याची त्यांना विशेष आवड असल्याने त्यांच्या या जिव्हाळ्याच्या नात्याची आठवण कायमस्वरूपी जपण्याचा परिवाराने निर्णय घेतला.
त्यामुळे ज्या शेताशी प्रमिलाताईंच्या आठवणी आणि आयुष्यभराचे नाते जोडलेले होते, त्याच शेतात त्यांच्या अस्थींचे रक्षाविसर्जन करण्यात आले. पर्यावरणपूरक पद्धतीने पार पडलेल्या या भावनिक विधीतून ‘ज्या मातीत आयुष्यभर कष्ट केले, त्याच मातीत अंतिम स्मृती जपाव्यात’ असा हृदयस्पर्शी संदेश देण्यात आला. प्रमिलाताईंचे निसर्गप्रेम, शेतीवरील माया आणि मातीशी असलेले नाते या अनोख्या निर्णयामुळे त्यांच्या स्मृतींसोबत कायमचे जोडले गेले.