कथित ऑडिओ क्लिप व्हायरल” भाजपाचे माजी उत्तर महाराष्ट्र संयोजक विजय चौधरी यांनी आपल्या पदाचा दिला तडकाफडकी राजीनामा..
मार्मिक न्यूज नेटवर्क नंदुरबार :
कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने भाजपाचे माजी उत्तर महाराष्ट्र संयोजक विजय चौधरी यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. सोशल मीडियावर विजय चौधरी आणि भाजपाच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याची कथित ऑडिओ क्लिप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याची चर्चा असून, त्यानंतर पक्षाची बदनामी टाळण्यासाठी त्यांनी राजीनामा दिल्याची चर्चा रंगली आहे. मात्र, या कथित व्हायरल ऑडिओ क्लिपच्या सत्यतेची स्वतंत्रपणे कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही.

या कथित क्लिपमध्ये एकनाथ खडसे आणि केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याबाबत उल्लेख असल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. क्लिप व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना उधाण आले असून, या प्रकरणामुळे भाजपाची मोठी राजकीय कोंडी झाल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान, पक्षाकडून या विषयावर अधिकृत भूमिका काय असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या घडामोडींवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार यांनी ‘X’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रतिक्रिया देत भाजपावर निशाणा साधला. “भाजपा कधीही महिलांचा सन्मान करणारा पक्ष नव्हता. या प्रकरणावर पडदा टाकण्यासाठी हा राजीनामा देण्यात आला असून, त्यामुळे व्हायरल क्लिपला दुसरे वळण देण्याचा प्रयत्न केला जात आहे. आता महिला सन्मानाबाबत भाजपा कोणत्या तोंडाने बोलणार?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

दरम्यान, प्रसारमाध्यमांशी बोलताना ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनीही भाजपाच्या सध्याच्या कार्यपद्धतीवर टीका केली. “जुनी भाजपा आणि आताची भाजपा यात मोठा फरक आहे. पूर्वीचा पक्ष कार्यकर्त्यांचा सन्मान करणारा होता. मात्र आता चुकीच्या पार्श्वभूमीच्या लोकांनाही मोठी पदे दिली जात आहेत. महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणारे पदाधिकारी पक्षात आहेत आणि अशा घटनांमुळे भाजपाची प्रतिमा मलिन होत आहे,” असे खडसे म्हणाले.
टीप : या बातमीत उल्लेख केलेल्या व्हायरल ऑडिओ क्लिपच्या सत्यतेची आम्ही स्वतंत्रपणे पुष्टी करत नाही. संबंधित नेत्यांच्या सार्वजनिक प्रतिक्रिया आणि उपलब्ध माहितीनुसार ही बातमी तयार करण्यात आली आहे.