शालार्थ आयडी घोटाळ्याचे पडसाद अमळनेरात; एसआयटीच्या तपासामुळे शिक्षण क्षेत्रात वाढली धास्ती
अमळनेर : विक्की जाधव.
जळगाव जिल्ह्यात गाजत असलेल्या शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासाने आता वेग घेतला असून, दोन प्रमुख आरोपींना अटक झाल्यानंतर शिक्षण क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे. तपासाची व्याप्ती वाढत असल्याने अमळनेरसह जिल्ह्यातील विविध शैक्षणिक संस्थांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे. काही संस्थांची कागदपत्रे आणि नियुक्ती प्रक्रियेची पडताळणी सुरू असल्याची चर्चा असून, पुढील काही दिवसांत एसआयटीची कारवाई कोणत्या दिशेने वळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नाशिक येथे शेकडो शिक्षकांची सखोल चौकशी झाल्यानंतर नियुक्ती आदेश, सेवा पुस्तिका, शालार्थ आयडी, मंजुरी आदेश आणि वेतनाशी संबंधित कागदपत्रांमधील विसंगतींची तपासणी अधिक तीव्र करण्यात आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, यापूर्वी अमळनेर येथील चौकशीला सामोरे गेलेल्या तसेच न्यायालयातून जामिनावर मुक्त झालेल्या काही संबंधितांनाही आवश्यकतेनुसार पुन्हा चौकशीसाठी बोलावले जाऊ शकते. तपास यंत्रणा प्रत्येक पुराव्याची बारकाईने पडताळणी करत असून, समाधानकारक स्पष्टीकरण न मिळाल्यास कायदेशीर कारवाईची शक्यता नाकारता येत नाही.
मागील काळात अमळनेरमधील काही संबंधितांना त्यांच्या राहत्या घरातून चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याच्या घटनांमुळेही परिसरात या प्रकरणाची मोठी चर्चा होती. त्यामुळे आता तपासाची पुढील दिशा काय असेल, आणखी कोणाची चौकशी होईल का आणि नव्या कारवाया होतील का, याबाबत शिक्षण क्षेत्रात उत्सुकता आणि धास्तीचे वातावरण आहे. एसआयटीचा तपास निर्णायक टप्प्यात पोहोचल्याने आगामी घडामोडींवर संपूर्ण अमळनेरचे लक्ष केंद्रित झाले आहे.