समाधीस्थळांचे संरक्षण व स्वतंत्र समाधीभूमीची मागणी; खान्देश दशनाम गोसावी समाजाचे अमळनेरात निवेदन
अमळनेर : विक्की जाधव.
खान्देश दशनाम गोसावी समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी समाजाचे माननीय अध्यक्ष भाऊसाहेब साहेबराव गोसावी यांच्या नेतृत्वाखाली धुळे–जळगाव–नंदुरबार संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी अमळनेर येथील प्रांत अधिकारी, तहसीलदार तसेच नगरपालिका मुख्याधिकारी यांची भेट घेत निवेदन सादर केले. समाजाच्या धार्मिक व सामाजिक वारशाशी निगडित प्रश्न तातडीने मार्गी लावावेत, अशी मागणी करत प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.
निवेदनात मंगळ ग्रह मंदिर परिसरातील गोसावी समाजाच्या प्राचीन समाधीस्थळांचे संरक्षण करण्यात यावे, विटंबना झालेल्या समाधींची तातडीने दुरुस्ती करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच गजानन महाराज मंदिराजवळ पूर्वी अस्तित्वात असलेल्या समाजाच्या समाधी अतिक्रमण व बांधकामांमुळे नाहीशा झाल्याचा दावा करत या प्रकरणाची सखोल चौकशी करून आवश्यक कायदेशीर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली. याशिवाय अमळनेर शहरातील वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर गोसावी समाजासाठी शासनाच्या उपलब्ध गावठाण अथवा शासकीय जागेत स्वतंत्र कायमस्वरूपी समाधीभूमी राखीव करून द्यावी, अशी प्रमुख मागणी करण्यात आली.
यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी समाजाच्या मागण्यांची सकारात्मक दखल घेत उपलब्ध शासकीय गावठाण जागेची माहिती तलाठी यांच्या माध्यमातून नकाशासह तपासून पुढील कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. या प्रसंगी शिवाजी आप्पा गोसावी, वासुदेव (मोठाभाऊ) गोसावी, किरण भारती, शरद (नाना) गोसावी, किरण गोसावी, रमेश (तात्या) गोसावी, गजेंद्र सर, माणिक सर, भिका दादा, तुषार गोसावी, सागर गोसावी, मोतीलाल भारती, संजय गिरी गोसावी, पप्पू गोसावी, संतोष गोसावी, बापू ज्ञानगिरी गोसावी, मुकेश गोसावी, अशोकगीर गोसावी, विलास गोसावी, गोपाल गोसावी यांच्यासह मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.