भिगवण – शेतकऱ्यांच्या मोटारीच्या केबल चोरणारा अट्टल चोरटा जेरबंद; १ लाख ७६ हजारांचा मुद्देमाल हस्तगत
( निलेश गायकवाड )
भिगवण (प्रतिनिधी) – भिगवण पोलीस स्टेशनच्या हद्दीत शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक मोटारीच्या कॉपर केबल चोरीचे प्रमाण वाढले होते. शेतकरी आधीच दुष्काळाने त्रस्त असताना केबल चोरीने त्यांना हवालदिल केले होते. या गंभीर गुन्ह्याचा अखेर भिगवण पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.
पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी गुन्ह्यांचा सखोल तपास करून गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार भिगवण पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सोमनाथ शेंडगे यांनी गुन्हे शोध पथकाला (डी.बी.) मार्गदर्शन केले.
काय आहे घटना?
दि. ११/०९/२०२६ रोजी रात्री २ ते २:१० वाजता मौजे मदनवाडी, ता. इंदापूर येथे गट नं. ४३ मधील शेतकरी पांडुरंग मारुती बंडगर (वय ४५) यांच्या शेतातील ७० मीटर केबल वायर, किंमत ११,२००/- रु. अज्ञात चोरट्याने चोरून नेली. याबाबत भिगवण पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि. नं. २२८/२०२६, BNS कलम ३०३(२) प्रमाणे दाखल करण्यात आला होता.
गोपनीय माहितीवरून सापळा
तपास चालू असताना गोपनीय बातमीदारामार्फत व मदनवाडी येथील दक्ष नागरिकाच्या मदतीने आरोपीला ताब्यात घेण्यात आले.
आरोपीचे नाव – टिंकू रामसेवक राजपुत, वय २३ वर्षे, मूळ रा. नगला इमली, शाहपूर ब्राम्हण, आग्रा, राज्य उत्तर प्रदेश, सध्या रा. मदनवाडी, ता. इंदापूर.
चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्याकडून चोरीस गेलेला मुद्देमाल काढून घेतला आहे.
एक-दोन नव्हे तर १८ गुन्हे उघड
या अटक आरोपीकडून खालील गुन्हे उघडकीस आले आहेत –
१) भिगवण पो.स्टे. गु.रजि.नं. २२८/२०२६
२) भिगवण पो.स्टे. गु.रजि.नं. २२९/२०२६
या दोन्ही गुन्ह्यातील १८ शेतकऱ्यांचा एकूण १,७६,२५०/- रुपयांचा कॉपर केबल वायरचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. त्याने आणखी काही गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक सोमनाथ शेंडगे, पोउपनि अमित पाटील, नाना वीर, पोलीस अंमलदार रामदास कर्चे, सचिन पवार, समीर झांबरे, सचिन भसे, शहाजी सुद्रीक व मदनवाडी येथील दक्ष नागरिक यांनी केली आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार रामदास कर्चे करीत आहेत.