मदनवाडी ग्रामपंचायतीच्या पाठपुराव्याला यश; पुलाच्या संरक्षण अँगलचे काम पूर्ण
(निलेश गायकवाड)
मदनवाडी / भिगवण :
मदनवाडी गावच्या मुख्य रस्त्यावरील धोकादायक बनलेल्या पुलाच्या संरक्षण अँगलच्या दुरुस्तीची मागणी ग्रामपंचायत मदनवाडीने लावून धरली होती. अखेर या मागणीला यश आले असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने पुलावरील संरक्षण अँगलचे काम पूर्ण करण्यात आले आहे.
मदनवाडी गावात जाणाऱ्या पुलावरील संरक्षण अँगल तुटल्याने शाळेत जाणाऱ्या लहान मुला-मुलींसह ग्रामस्थांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. पुलाच्या कडेला आधार नसल्याने तसेच पुलाखाली पाण्याची पातळी अधिक असल्यामुळे अपघाताची भीती व्यक्त केली जात होती. त्यातच हा मदनवाडी गावात ये-जा करण्यासाठीचा मुख्य रस्ता असून या मार्गावर अवजड वाहनांचीही मोठ्या प्रमाणात वर्दळ असते.
या गंभीर परिस्थितीची दखल घेत सरपंच सौ. अश्विनी बंडगर यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, उपविभाग भिगवण यांच्याकडे विनंती रिपोर्ट सादर करून पुलावरील तुटलेला संरक्षण अँगल तातडीने बसविण्याची मागणी केली होती.
ग्रामपंचायतीच्या मागणीची तातडीने दखल घेत उपविभागीय सार्वजनिक बांधकाम अभियंता श्री. तुपे साहेब यांनी या कामाला मंजुरी दिली. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आवश्यक कार्यवाही करून पुलावरील संरक्षण अँगलचे काम पूर्ण केले.
शाळकरी मुले, ग्रामस्थांना मोठा दिलासा.
पुलाच्या संरक्षण अँगलचे काम पूर्ण झाल्यामुळे शाळकरी मुले, ग्रामस्थ तसेच वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. पुलावरील सुरक्षेचा प्रश्न मार्गी लागल्याने ग्रामस्थांनी सरपंच सौ. अश्विनी बंडगर तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे आभार व्यक्त केले आहेत.