अमळनेरात अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची मोठी कारवाई; ६ ट्रॅक्टर जप्त
अमळनेर : विक्की जाधव
जळगाव जिल्ह्यात अवैध वाळू उपसा व वाहतुकीविरोधात पोलिसांनी २७ जुलै रोजी विशेष मोहीम राबवत मोठी कारवाई केली. जिल्हाभरात सात गुन्हे दाखल करण्यात आले असून दोन प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या मोहिमेत अमळनेर उपविभागातही मोठी कारवाई करण्यात आली असून तब्बल ६ ट्रॅक्टर आणि ७.५० ब्रास अवैध वाळू ताब्यात घेण्यात आली आहे. या कारवाईमुळे वाळू माफियांमध्ये खळबळ उडाली असून प्रशासनाने अवैध उत्खननाविरोधात कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्हाभरात एकूण ७ डंपर, ७ ट्रॅक्टर आणि १९.५० ब्रास वाळू जप्त करण्यात आली असून सुमारे ₹८८ लाख ६ हजार ५०० किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.
अमळनेरमध्ये अद्याप गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असली तरी जप्त करण्यात आलेल्या ट्रॅक्टर आणि वाळूमुळे अवैध वाहतुकीवर मोठा आळा बसल्याचे मानले जात आहे.
या विशेष मोहिमेत संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी, विनायकराव कोते पाटील, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम. महसूल विभागाचे अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे सहभाग घेतला. अवैध वाळू उपसा व वाहतुकीविरोधातील कारवाई यापुढेही अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे संकेत प्रशासनाकडून देण्यात आले असून, अमळनेरसह जिल्ह्यातील नदीपात्रांमध्ये बेकायदा वाळू उपसा करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.