धरणगावात विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी जनआक्रोश! NEET पेपरफुटीच्या निषेधार्थ हजारोंचा कॅण्डल मार्च; भ्रष्ट शिक्षण व्यवस्थेविरोधात बुलंद आवाज
पत्रकार : विक्की जाधव
शिक्षण व्यवस्थेतील वाढता भ्रष्टाचार, NEET पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाईची मागणी आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याशी होणाऱ्या अन्यायाविरोधात धरणगाव शहरात भव्य कॅण्डल मार्च काढण्यात आला. शांततापूर्ण वातावरणात पार पडलेल्या या आंदोलनात विद्यार्थी, पालक, शिक्षक, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि संविधानप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी एकजुटीचा संदेश दिला. हातात मेणबत्त्या आणि न्यायाच्या घोषणा देत नागरिकांनी शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकता, गुणवत्ता आणि भ्रष्टाचारमुक्त व्यवस्था उभारण्याची जोरदार मागणी केली.
“विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांना माफी नाही”, “शिक्षण वाचवा – विद्यार्थ्यांना न्याय द्या” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. हा कॅण्डल मार्च केवळ निषेधापुरता मर्यादित नसून विद्यार्थ्यांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी सुरू झालेल्या व्यापक जनआंदोलनाचा भाग असल्याचे आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी तडजोड करणाऱ्यांवर कठोर कारवाई होईपर्यंत आणि न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहील, असा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.
या आंदोलनात ॲड. कौस्तुभ पाटील (जिल्हाध्यक्ष, NSUI), ज्येष्ठ नेते धनगर दला पाटील, प्रताप पाटील (जिल्हा काँग्रेस सचिव), दिनेश पवार, उमेश संदानशिव, प्रवीण पाटील, हेमंत पाटील (NSUI तालुका अध्यक्ष), सुमित पाटील, जयेश पाटील, शैलेंद्र पाटील, अनिल कुंभार, कृष्णा पाटील, राज पाटील यांच्यासह धरणगाव शहरातील अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. तसेच रामचंद्र महाजन (सचिव, ओबीसी सेल महाराष्ट्र प्रदेश), सुनील घनश्याम सोनार, सलीम दादा बेलदार, विजय जनकवार, भूषण भागवत आणि योगेश येवले यांनीही उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या न्यायाच्या लढ्याला आपला ठाम पाठिंबा दर्शविला. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी तडजोड होऊ नये, यासाठी समाज एकवटल्याचे या आंदोलनातून अधोरेखित झाले.