विद्यार्थ्यांच्या शांततापूर्ण लढ्याला अखेर यश! केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा; आंदोलन मागे
मार्मिक न्यूज नेटवर्क : विक्की जाधव
देशभरातील विद्यार्थ्यांनी शांततापूर्ण आणि लोकशाही मार्गाने उभारलेल्या आंदोलनाला अखेर मोठे यश मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी विजयाचा जल्लोष करत आंदोलन मागे घेतले. विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी सुरू असलेल्या या संघर्षाने देशाचे लक्ष वेधून घेतले होते. शांततेच्या मार्गाने केलेल्या आंदोलनाने लोकशाहीतील जनशक्ती पुन्हा एकदा अधोरेखित केली.
या आंदोलनादरम्यान आंदोलनकर्त्यांवर लाठीमार झाल्याचे तसेच एका महिलेला वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने कानशिलात मारल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. या घटनेनंतर देशभरातून संताप व्यक्त करण्यात आला. जनतेच्या तीव्र प्रतिक्रिया आणि वाढत्या दबावानंतर संबंधित चार वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती समोर आली. या कारवाईमुळे प्रशासनालाही कठोर निर्णय घ्यावा लागला.
दरम्यान, अभिजीत दिपके यांनी आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा केली. विद्यार्थ्यांनी कोणताही हिंसाचार न करता संविधानिक मार्गाने केलेल्या लढ्यामुळे अखेर सरकारला निर्णय घ्यावा लागल्याची भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली. हा विजय केवळ विद्यार्थ्यांचा नसून लोकशाही, संयम आणि शांततापूर्ण आंदोलनाच्या ताकदीचा असल्याचे मत विविध स्तरातून व्यक्त होत आहे.