“AI तंत्रज्ञान काळाची गरज; विद्यार्थ्यांनी न्यूनगंड न बाळगता प्रशिक्षण घ्यावे” आमदार अनिल पाटी
अमळनेर : विक्की जाधव
AI तंत्रज्ञान हे आजच्या युगातील अद्ययावत ज्ञानाचे प्रभावी साधन असून, विद्यार्थ्यांनी न्यूनगंड न बाळगता कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आत्मसात करणे ही काळाची गरज आहे. AI चा योग्य वापर केल्यास शिक्षण, प्रशासन, शेती आणि उद्योग क्षेत्रात मोठी प्रगती साधता येऊ शकते, असे प्रतिपादन आमदार अनिल पाटील यांनी केले.
AISECT-HAL कौशल्य रथ आणि प्रताप महाविद्यालय (स्वायत्त), अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त पूज्य साने गुरुजी सभागृहात AI तंत्रज्ञान विद्यार्थी बक्षीस समारंभ तसेच स्वर्गीय अजितदादा पवार कृषी सन्मान पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खानदेश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष सी.ए. नीरज अग्रवाल होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी दानशूर प्रताप शेठजी, सरस्वती देवी, पूज्य साने गुरुजी आणि स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रतिमांचे पूजन आमदार अनिल पाटील, AISECT विद्यापीठाचे समन्वयक बिनेश वर्मा, सी.ए. नीरज अग्रवाल, माजी आमदार शरद पाटील, श्यामकांत सनेर, विनोद अग्रवाल, कमल कोचर, हरी वाणी, प्रदीप अग्रवाल आणि वसुंधरा लांडगे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक HAL कौशल्य रथचे समन्वयक महेंद्र शिरसाठ यांनी केले.
यावेळी बिनेश वर्मा यांनी AI चा सुरक्षित वापर करण्याचे महत्त्व सांगताना बँकिंग माहिती, पासवर्ड किंवा वैयक्तिक माहिती कोणत्याही AI प्लॅटफॉर्मवर टाकू नये, असा सल्ला दिला. AI च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना इंटर्नशिप, प्रोजेक्ट आणि आधुनिक कौशल्यांची संधी उपलब्ध करून देण्याचा मानस असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आमदार अनिल पाटील यांनी आपल्या भाषणात AI मुळे अद्ययावत माहिती सहज उपलब्ध होत असून भविष्यातील स्पर्धेत टिकून राहण्यासाठी हे तंत्रज्ञान आत्मसात करणे आवश्यक असल्याचे सांगितले. CSR निधीतून विद्यार्थ्यांसाठी आधुनिक AI कौशल्य रथ उपलब्ध करून देण्यात आला असून ग्रामीण आणि शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांनीही या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. शेतीमध्येही AI चा वापर करून उत्पादनक्षमता आणि आधुनिक शेती पद्धती विकसित करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
यावेळी प्रकाश बडगुजर, लिलाबाई ठाकूर, किशोर पाटील, बापूसाहेब देवरे आणि शरद सोनवणे यांना उत्कृष्ट कृषी सन्मान पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच AI प्रशिक्षणात सहभागी झालेल्या प्रताप महाविद्यालयातील नऊ विद्यार्थ्यांनाही पुरस्कार व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रशिक्षिका परिणिता पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले, तर दीपक चौधरी यांनी तांत्रिक सहकार्य केले. शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, प्राध्यापक, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाल्मिक जाधव यांनी केले, तर आभार प्राचार्य डॉ. हर्षवर्धन जाधव यांनी मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.