मंगळग्रह मंदिराकडे जाणारा रस्ता जीवघेणा; खड्ड्यांनी भाविकांसह नागरिक हैराण, फुटलेल्या जलवाहिनीमुळे हजारो लिटर पाणी वाया..
अमळनेर : विक्की जाधव.
राज्यभर प्रसिद्ध असलेल्या अमळनेर येथील मंगळग्रह मंदिरात दर मंगळवारी तसेच इतर दिवशीही हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. मात्र कृष्णा HP पेट्रोल पंप ते चोपडा नाका या मुख्य मार्गाची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून “रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता?” असा प्रश्न निर्माण झाला आहे. मोठमोठ्या खड्ड्यांमुळे दुचाकीस्वार, चारचाकी चालक आणि पायी जाणाऱ्या भाविकांना मोठी कसरत करावी लागत असून रोजच लहान-मोठे अपघात घडत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
शहरातील प्रभाग क्रमांक ३ मधील हा चोपडा रस्ता शहराला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. मंगळग्रह मंदिराकडे जाणाऱ्या हजारो भाविकांसह विविध वाहनांची सतत या मार्गावर वर्दळ असते. मात्र रस्त्याची झालेली दुर्दशा प्रशासनाच्या निष्काळजीपणाचे जिवंत उदाहरण ठरत आहे. त्यामुळे या मार्गाचे डांबरीकरण न करता इतर प्रमुख रस्त्यांप्रमाणेच दर्जेदार सिमेंट काँक्रीटचा रस्ता तातडीने करण्यात यावा, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.
दरम्यान, कृष्णा HP पेट्रोल पंपाजवळील मुख्य पाणीपुरवठा जलवाहिनीही मोठ्या प्रमाणावर फुटली असून दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. पाणीटंचाईच्या काळात अशा प्रकारे पाण्याची नासाडी होत असतानाही संबंधित विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याची नाराजी व्यक्त केली जात आहे. नगरपालिकेने तातडीने फुटलेली जलवाहिनी दुरुस्त करून रस्त्याचीही युद्धपातळीवर दुरुस्ती करावी, अन्यथा नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशाराही स्थानिकांनी दिला आहे.