अमळनेरकरांच्या जीवाशी खेळ! पाण्याच्या टाक्यांतील गाळाचा उपनगराध्यक्षांनी केला भांडाफोड
अमळनेर : विक्की जाधव.
शहरातील दूषित पाणीपुरवठ्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना उपनगराध्यक्ष प्रशांत निकम यांनी थेट पाण्याच्या टाकीत उतरून धक्कादायक वास्तव समोर आणले आहे. शहरातील अनेक पाण्याच्या टाक्यांमध्ये वर्षानुवर्षे गाळ साचलेला असल्याचे समोर आले असून, यामुळे अमळनेरकरांच्या आरोग्याशी गंभीर खेळ सुरू असल्याचा आरोप होत आहे. नागरिकांकडून सातत्याने तक्रारी होत असतानाही सत्ताधाऱ्यांकडून ठोस उपाययोजना होत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
केवळ कागदोपत्री अहवालांवर विश्वास न ठेवता उपनगराध्यक्ष प्रशांत निकम यांनी कोर्टामागील पाण्याच्या टाकीत स्वतः उतरून प्रत्यक्ष पाहणी केली. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांनी केलेल्या या धाडसी कृतीमुळे पाणीपुरवठा व्यवस्थेतील निष्काळजीपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्या प्रशासनावर यानिमित्ताने अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, “शहरातील सर्व पाण्याच्या टाक्यांची तातडीने स्वच्छता व तपासणी करण्यात यावी,” अशी मागणी जोर धरू लागली आहे.
दरम्यान, नगरपालिकेतील सत्ताधारी आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. “अमळनेरकरांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांवर कारवाई होणार का?”, “दूषित पाण्यामुळे उद्भवणाऱ्या आजारांना जबाबदार कोण?” असे सवाल उपस्थित केले जात आहेत. आता तरी नगराध्यक्ष परीक्षित बाविस्कर यांनी या गंभीर प्रश्नाकडे उघड्या डोळ्यांनी पाहून नागरिकांच्या आरोग्याला प्राधान्य द्यावे, अशी अपेक्षा अमळनेरकर व्यक्त करत आहेत.