पुणे ग्रामीण पोलिसांची कठोर कारवाई;सहा गंभीर गुन्ह्यांतील आरोपी एमपीडीए अंतर्गत तडीपार
शिक्रापूर पोलिसांचे मोठे पाऊल; गुन्हेगाराची नागपूर कारागृहात रवानगी
शिक्रापूर/प्रतिनिधी – वर्षा चव्हाण
पुणे शहरालगतच्या शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत औद्योगिकीकरणाबरोबरच गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी कठोर कारवाईचा धडाका सुरू केला आहे. त्याच अनुषंगाने गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये वारंवार सहभागी असलेल्या सराईत गुन्हेगारास महाराष्ट्र धोकादायक व्यक्ती प्रतिबंधक कायदा (एमपीडीए) अंतर्गत स्थानबद्ध करण्यात आले आहे.
गणेश भाऊसाहेब फडतरे (वय ३५, रा. फडतरेवस्ती, कोरेगाव भीमा, ता. शिरूर, जि. पुणे) असे स्थानबद्ध करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरोधात शिक्रापूर व लोणीकंद पोलीस ठाण्यांमध्ये खुनाचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा, बेकायदेशीर जमाव जमवून अग्निशस्त्रासह हल्ला करणे, खंडणीसाठी खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी तसेच बालकाचे अपहरण करून मारहाण करणे यांसारखे गंभीर स्वरूपाचे सहा गुन्हे दाखल आहेत.
पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांच्या निर्देशानुसार तत्कालीन पोलीस निरीक्षक दीपकरतन गायकवाड यांनी आरोपीच्या गुन्हेगारी कारवायांचा सविस्तर आढावा घेत एमपीडीए अंतर्गत प्रस्ताव तयार केला होता. हा प्रस्ताव जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डूड्डी यांच्याकडे सादर करण्यात आला. प्रस्तावातील पुरावे व आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी विचारात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी गणेश फडतरे यास ‘धोकादायक व्यक्ती’ या सदराखाली स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले.
यानंतर पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने आरोपीला ताब्यात घेत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली. त्यानंतर त्याची नागपूर येथील मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली.
ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये तत्कालीन पोलीस निरीक्षक दीपकरतन गायकवाड, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे, जितेंद्र पानसरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महेश बनकर तसेच अंमलदार रोहिदास पारखे, अमोल दांडगे, श्रीमंत होणमाने, शिवाजी चितारे, मच्छिंद्र निश्चित, राम जाधव आणि नारायण वाळके यांनी सहभाग घेतला.