लोकप्रतिनिधी निष्क्रिय, नागरिक सक्रिय! साने गुरुजी स्मृतिदिनी श्रमदानातून रस्ता दुरुस्त
अमळनेर : विक्की जाधव.
थोर स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक आणि साहित्यिक साने गुरुजी यांच्या स्मृतिदिनानिमित्त अमळनेर येथील साने गुरुजी स्मारक परिसरात एक प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला. स्मारकाकडे जाणाऱ्या रस्त्याची दयनीय अवस्था आणि ठिकठिकाणी पडलेले खड्डे पाहून नागरिकांनी कोणाची वाट न पाहता स्वतःच श्रमदान करण्याचा निर्णय घेतला. फावडे, घमेले आणि टिकम घेऊन नागरिक रस्त्यावर उतरले आणि खड्डे बुजवून साने गुरुजींच्या विचारांना कृतीची जोड दिली.
स्मारकाकडे जाणारा रस्ता अनेक दिवसांपासून दुर्लक्षित असल्याची भावना यावेळी अनेकांनी व्यक्त केली. समाजहिताच्या कामांसाठी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आणि संबंधित यंत्रणा अपयशी ठरत असताना सामान्य नागरिकांनी पुढाकार घेतल्याने हा उपक्रम चर्चेचा विषय ठरला. “जेव्हा व्यवस्था झोपते, तेव्हा समाज जागा होतो,” याची प्रचिती या श्रमदानातून दिसून आली. रस्त्याच्या डागडुजीसह नागरिकांनी व्यवस्थेच्या उदासीनतेवरही अप्रत्यक्षपणे बोट ठेवले.
या उपक्रमात सामाजिक कार्यकर्ते, साने गुरुजींच्या विचारांवर चालत असलेले तरुण आणि अनेक नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. श्रमदान, सामाजिक बांधिलकी आणि लोकहिताची जाणीव हीच साने गुरुजींना खरी आदरांजली असल्याची भावना सर्वांनी व्यक्त केली. स्मृतिदिनानिमित्त झालेले हे श्रमकर्तव्य केवळ रस्त्याचे खड्डे बुजवणारे नव्हते, तर समाजाने एकत्र येऊन प्रश्न सोडविण्याची ताकद दाखवणारे ठरले.
सामाजिक कार्यकर्त्या: दर्शना पवार यांनी आपल्या सोशल मीडिया हॅण्डल च्या माध्यमातून लोकप्रतिनिधींना मिळणारे मानधन, विविध सुविधा आणि निवृत्तीनंतरची पेन्शन यांची आठवण करून देत, “ते स्वतःच्या खिशातून जनतेची कामे करत नाहीत, तरीही उपकार केल्यासारखी वागणूक देतात,” अशी झणझणीत टीका केली. लोकांनीही अशा मानसिकतेला खतपाणी घालणे थांबवून आपल्या हक्कांसाठी ताठ मानेने उभे राहण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
“खरे परिवर्तन तेव्हाच घडेल, जेव्हा मतदार पैशांच्या किंवा वैयक्तिक स्वार्थाच्या पलीकडे जाऊन मूलभूत प्रश्नांवर मतदान करतील,” असे मत व्यक्त करत त्यांनी तरुणाई, शेतकरी आणि महिलांना जागृत होण्याचे आवाहन केले. “पाठीचा कणा ताठ ठेवून लोकशाहीतील हक्कांसाठी संघर्ष करणाऱ्यांसोबत आम्ही लवकरच मूलभूत प्रश्नांवर भेटू,” असा निर्धार व्यक्त करत दर्शना पवार यांनी जनआंदोलनाची दिशा स्पष्ट केली आहे.