वृत्तपत्र जाहिरात दरात १५०% वाढीची मागणी; व्हॉईस ऑफ मीडियाचे प्रशासनाला निवेदन
अमळनेर : विक्की जाधव.
राज्यातील वृत्तपत्र उद्योग आर्थिक अडचणीत सापडला असून, वाढत्या खर्चाच्या पार्श्वभूमीवर शासनाने तात्काळ जाहिरात दरात १५०% वाढ करावी, अशी ठाम मागणी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीसाठी अमळनेर येथील प्रांताधिकारी व तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करण्यात आले.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, २०१९ पासून कागद, शाई, वीज व मजुरी खर्चात मोठी वाढ झाली असूनही शासनाच्या जाहिरात दरात कोणतीही सुधारणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे लघु व मध्यम वृत्तपत्रांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. यासोबतच जाहिरात देयके ३० दिवसांत अदा करावीत व ई-टेंडर जाहिराती पूर्ण स्वरूपात प्रसिद्ध कराव्यात, अशा मागण्या करण्यात आल्या.यावेळी पत्रकारांवर होणाऱ्या वाढत्या हल्ल्यांबाबतही तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. पत्रकार संरक्षण कायद्याची कडक अंमलबजावणी करावी, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संघटनेने दिला. या प्रसंगी डॉ. डिगंबर महाले, उमेश काटे, जयंत वानखेडे यांच्यासह अनेक पत्रकार उपस्थित होते.