पुणे जिल्ह्यात युवक-युवतींसाठी अल्प मुदतीच्या प्रशिक्षणाची सुवर्णसंधी; १ एप्रिलपासून नवीन बॅचेस सुरू

पुणे/प्रतिनिधी – वर्षा चव्हाण
जिल्ह्यातील युवक-युवतींसाठी कौशल्य विकास आणि रोजगाराच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणारा अल्प मुदतीचा प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत असून, या कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यातील नवीन बॅचेस १ एप्रिल २०२६ पासून सुरू होणार आहेत. पात्र उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) यांच्या माध्यमातून १५ ते ४५ वयोगटातील युवक-युवतींसाठी हा कार्यक्रम ८ ऑक्टोबर २०२५ पासून सुरू करण्यात आला होता. आता दुसऱ्या टप्प्यात अधिकाधिक उमेदवारांना प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे.
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमांतर्गत शासकीय आयटीआय आणि तांत्रिक विद्यालयांमधील अत्याधुनिक साधनसामग्रीचा वापर करून तज्ञ मार्गदर्शकांकडून प्रशिक्षण दिले जाणार आहे. हा कार्यक्रम उद्योगांच्या गरजांनुसार (डिमांड ड्रिव्हन) तयार करण्यात आला असून, उमेदवारांना अद्ययावत व प्रगत कौशल्ये आत्मसात करण्याची संधी मिळणार आहे.
या प्रशिक्षणासाठी शिक्षण घेत असलेले, शिक्षण पूर्ण केलेले तसेच शिक्षण अर्धवट सोडलेले युवक-युवती पात्र आहेत. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांना प्रमाणपत्र देण्यात येणार असून, त्याद्वारे रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी वाढण्यास मदत होणार आहे.
या उपक्रमाची माहिती जास्तीत जास्त युवक-युवतींपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन सहायक आयुक्त सु.रा. वराडे (जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पुणे) यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी इच्छुकांनी जिल्ह्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व तांत्रिक विद्यालयांशी संपर्क साधावा किंवा जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रास्ता पेठ, पुणे येथे भेट द्यावी. तसेच (०२०) २६१३३६०३ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.