खान्देशकन्या प्रेरणा खवळे यांचा लोणचारम येथे भव्य नागरी सत्कार
अमळनेर : विक्की जाधव.
तालुक्यातील लोणचारम येथे यूपीएससी परीक्षेत घवघवीत यश संपादन करणाऱ्या खान्देशकन्या प्रेरणा कैलास खवळे यांचा दि. २२ रोजी सायंकाळी ६ वाजता भव्य नागरी सत्कार सोहळा उत्साहात संपन्न झाला. मातंग समाजातून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवणाऱ्या त्या पहिल्या मुलगी ठरल्याने संपूर्ण परिसरात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. कार्यक्रमाच्या प्रारंभी गावातून त्यांची वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली. गावकऱ्यांनी औक्षण करून त्यांचे जंगी स्वागत केले. लोणचारमची चुलत भाची असलेल्या प्रेरणा खवळे यांच्या यशामुळे गावात उत्साह आणि आनंदाचे वातावरण होते.

सत्काराला उत्तर देताना प्रेरणा खवळे यांनी आपल्या यशाचा प्रवास सांगत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या की, यशासाठी सातत्य, कठोर परिश्रम आणि कुटुंबाचे पाठबळ अत्यंत महत्त्वाचे असते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी न्यूनगंड न बाळगता मोठी स्वप्ने पाहावीत आणि त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावेत, असे त्यांनी सांगितले. यावेळी महेश पाटील व हरिश्चंद्र कढरे गुरुजी यांनीही आपली मनोगते व्यक्त करून प्रेरणा यांच्या यशाचे कौतुक केले.

या कार्यक्रमाचे आयोजन श्री. संजय बाबुराव थोरात, ग्रामस्थ लोणचारम व समस्त मातंग समाज बांधवांच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरपंच प्रा. शशिकांत पाटील यांनी केले, तर उपस्थित मान्यवर व ग्रामस्थांचे आभार मधुकर पाटील यांनी मानले. यावेळी विविध मान्यवर, ग्रामस्थ व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमामुळे लोणचारम गावात प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा खवळे आदर्श ठरत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.