हिंदू संमेलन उत्साहात संपन्न; पंच परिवर्तनावर प्रमुख वक्त्यांचे मार्गदर्शन..
अमळनेर : विक्की जाधव.
शहरातील स्वामी समर्थ केंद्र परिसरातील हिंदू समाजाच्या एकजुटीचे दर्शन घडविणारे हिंदू संमेलन मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात संपन्न झाले. कार्यक्रमाची सुरुवात श्री स्वामी समर्थ मंदिर येथून भव्य मिरवणुकीने करण्यात आली.

मिरवणुकीत परिसरातील हिंदू बंधू-भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. संमेलनासाठी परिसरातील नागरिकांची स्वागत समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीच्या अध्यक्षपदी मराठा कॉलनी येथील श्री प्रशांत रंगराव शिंदे यांची एकमताने निवड करण्यात आली असून संपूर्ण हिंदू संमेलन त्यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडले.

संमेलनात प्रमुख वक्त्यांनी पंच परिवर्तन या विषयावर मार्गदर्शन करत सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधन, पर्यावरण संरक्षण, स्वदेशी आणि नागरी कर्तव्य या पाच महत्त्वाच्या विषयांवर उपस्थितांना प्रबोधन केले. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून सुशील महाराज विटनेरकर उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांच्या ऐवजी प्रजापिता ब्रह्मकुमारी येथील श्रीमती विद्या दीदी व शिवम कुटिया येथील माताजी उपस्थित होत्या. तसेच प्रमुख वक्ते श्री स्वप्नाली चौधरी यांच्या ऐवजी भुसावळ येथील इतिहास संशोधक श्री प्रवीणजी नायसे यांनी मार्गदर्शन केले.
या हिंदू संमेलनात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. नारायणी महिला मंडळाने धार्मिक गीतांचे सादरीकरण केले, तर चिरंजीव राजवीर चंद्रकांत कंखरे या बालकाने छत्रपती शिवाजी महाराजांवरील पोवाडा सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. साई लहरी भजनी मंडळाने भजनांचे सादरीकरण केले. कार्यक्रमाच्या शेवटी प्रमुख संत श्री बालकनाथ जी महाराज यांनी आशीर्वचन दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री रवींद्र लष्करे सर यांनी केले, प्रास्ताविक श्री प्रशांत वंजारी सर यांनी तर आभार प्रदर्शन श्री यश राजेंद्र वर्मा यांनी केले. कार्यक्रमासाठी भोजन प्रसादाची व्यवस्था परिसरातील डॉक्टर्स बंधूंनी केली होती, तर इतर सर्व खर्च परिसरातील प्रतिष्ठित हिंदू बांधवांनी उचलला.