करमाळा प्रतिनिधी (सागर गायकवाड):- सकल हिंदू समाज, करमाळा शहर व तालुका यांच्या वतीने आयोजित श्रीराम जन्मोत्सव मिरवणूक काल अत्यंत उत्साहात आणि पारंपरिक वातावरणात संपन्न झाली. विशेष म्हणजे, सध्याच्या काळात मिरवणुकीत सर्रास दिसणाऱ्या कर्णकर्कश डीजे ला फाटा देत, पुणे येथील ढोल-ताशा पथकाने आपल्या शिस्तबद्ध वादनाने करमाळावासियांची मने जिंकली.
मिरवणुकीचे मुख्य आकर्षण असलेल्या अयोध्येतील प्रभू श्रीरामांच्या हुबेहूब मूर्तीमुळे करमाळा नगरीत जणू अयोध्याच अवतरली असल्याची प्रचिती भाविकांना येत होती. भक्तीमय वातावरणात निघालेल्या या मिरवणुकीत प्रभू श्रीरामांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी केली होती.
सध्या लग्न समारंभ असो वा महापुरुषांची जयंती, प्रत्येक मिरवणुकीत डीजेचा कानठळ्या बसवणारा आवाज ऐकायला मिळतो. या आवाजामुळे नागरिक त्रस्त होऊन दरवाजे-खिडक्या बंद करणे किंवा घरापासून लांब जाणे पसंत करतात. मात्र, कालच्या मिरवणुकीत पुणे येथील ढोल-ताशा पथक, स्थानिक हलगी पथकांचा निनाद आणि शिवकालीन चित्तथरारक युद्धकला प्रात्यक्षिकांनी जुन्या संस्कृतीची आठवण करून दिली. कित्येक वर्षांनंतर असा देहभान विसरायला लावणारा पारंपरिक सोहळा अनुभवता आल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.
मिरवणुकीत महिलांचा सहभाग लक्षणीय होता. ढोल-ताशांच्या तालावर ताल धरत महिलांनी नारीशक्ती चा परिचय करून दिला.
एकूणच, डीजेच्या गोंगाटाशिवायही मिरवणूक किती भव्य आणि शिस्तबद्ध असू शकते, याचा एक आदर्श सकल हिंदू समाजाने काल करमाळ्यासमोर ठेवला आहे.