एका अनाजी” मुळे पालिकेची सत्ता धोक्यात? अमळनेर नगरपरिषदेत वाढतेय खदखद
आ.अनिल पाटील यांना राजकीय संधी? अमळनेर राजकारणात नवा ट्वीस्ट
अमळनेर : विक्की जाधव
अमळनेर नगरपरिषदेच्या राजकारणात सध्या एका नगरसेवकामुळे मोठा राजकीय ट्वीस्ट निर्माण झाला असून सत्ताधारी गटातच मोठी नाराजी असल्याच्या चर्चा जोर धरू लागल्या आहेत. या नगरसेवकाला राजकीय वर्तुळात “अनाजी पंत” या नावाने ओळखले जात असून त्यांच्या हस्तक्षेपामुळे अनेक नगरसेवक नाराज असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता अनेक नाराज कार्यकर्ते आणि काही नगरसेवक चौधरी गटातून बाहेर पडण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा शहरात रंगू लागल्या आहेत.
नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणुकीनंतर सत्ता स्थापन झाली; मात्र त्यानंतर अनेक कामांवरून वाद, मतभेद आणि अंतर्गत संघर्ष वाढल्याचे चित्र आहे. नगरपरिषदेतील अनेक विषयांच्या ठरावांवर सह्या घेण्यासाठी कर्मचाऱ्यांना नगरसेवकांच्या घरी जावे लागत असून बरेच नगरसेवक सह्या करण्यास तयार नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे नगरपरिषदेतील अनेक कामे प्रलंबित असल्याची चर्चा सध्या सुरू आहे.
दरम्यान, नगरपरिषदेतील काही नगरसेवकांचा तिसरा गट तयार झाल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. जर हा गट अधिकृतपणे तयार झाला तर नगरपरिषदेच्या सत्तेला तडे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे या सर्व घडामोडींच्या केंद्रस्थानी सत्तेतीलच एक नगरसेवक “अनाजी पंत” असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता शहरात एकच चर्चा सुरू झाली आहे. हा अनाजी पंत नेमका कोण?
काही नगरसेवकांमध्ये अशी नाराजी आहे की, बऱ्याच कामांमध्ये मर्यादेपलीकडे हस्तक्षेप केला जात आहे. अनेक कामांमध्ये कोणाला काम मिळेल, कोणाचे काम थांबेल, कोणाचा पत्ता कट होईल असे राजकारण सुरू असल्याच्या चर्चा देखील ऐकू येत आहेत. एवढेच नव्हे तर काही टेंडर प्रक्रियेतही अडथळे निर्माण झाल्याचे ही बोलले जात आहे.
एका नाराज नगरसेवकाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, “कार्यकर्ते तर सोडाच, आम्ही नगरसेवक असूनही आम्हाला नगरसेवकासारखी किंमत मिळत नाही. जर एका व्यक्तीमुळेच सत्ता आली असेल तर आमचाही रस्ता मोकळा आहे.” या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात आणखी खळबळ उडाली आहे.
या सर्व राजकीय घडामोडींमुळे विरोधकांना मोठी संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काही नाराज कार्यकर्ते आणि नगरसेवक नवीन राजकीय समीकरण जुळवण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा आहेत. त्यामुळे येत्या काळात अमळनेर नगरपरिषदेच्या राजकारणात मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
एकंदरीत अमळनेरच्या राजकारणात सध्या “अनाजी पंत” फॅक्टर जोरात चर्चेत आला असून येत्या काही दिवसांत राजकारणात मोठा स्फोट होण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत. आता सत्ताधारी नेते नाराजी कशी हाताळतात यावरच पुढील राजकीय भविष्य ठरणार असल्याचे बोलले जात आहे.
या सर्व राजकीय घडामोडींमुळे सध्याचे आमदार अनिल पाटील यांची राजकीय ताकद वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काही कार्यकर्ते पुन्हा त्यांच्या संपर्कात असल्याच्या चर्चा असून भविष्यात मोठे राजकीय समीकरण बदलू शकते, असे बोलले जात आहे.
एकंदरीत अमळनेर नगरपरिषदेतील सत्तेत सर्व काही आलबेल नसून अंतर्गत नाराजी, गटबाजी आणि हस्तक्षेपाच्या चर्चांमुळे येत्या काळात अमळनेरच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता माजी आमदार आणि न.पा चे सत्ताधारी गटाचे नेते यावर काय भूमिका घेतात याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
पुढील वृत्त लवकरच