करमाळा प्रतिनिधी (सागर गायकवाड) :- करमाळा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमारजी गोरे यांच्या विशेष सहकार्याने ४ कोटी २५ लाख १६ हजार ७७० रुपये इतका भरघोस निधी मंजूर झाला आहे. नगरपरिषदेत सत्तांतर झाल्यानंतर अवघ्या १०० दिवसांच्या आत इतका मोठा निधी खेचून आणल्याने शहरात समाधानाचे वातावरण असून, नगराध्यक्षा मोहिनी संजय सावंत यांनी पालकमंत्र्यांचे जाहीर आभार मानले आहेत.
महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत (जिल्हा स्तर) शहरातील महत्त्वाच्या कामांसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. यात प्रामुख्याने छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा परिसराच्या सुशोभीकरणासाठी ४५.६७ लाख रुपये, संगम चौक ते महात्मा गांधी पुतळा रस्ता डांबरीकरणासाठी १.४९ कोटी रुपये, चांदगुडे गल्लीतील विविध अंतर्गत रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी सुमारे ५६ लाख रुपये, चांदगुडे गल्लीत गटार बांधकामासाठी ३०.८९ लाख आणि प्रभाग क्र. १ मध्ये १० सीटच्या नवीन शौचालयासाठी २५.२७ लाख रुपये मंजूर झाले आहेत. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजनेतून प्रभाग क्र. १० (मौलाली माळ भाग) येथे विशेष लक्ष देण्यात आले आहे. यामध्ये गटार बांधकामासाठी सुमारे ६८ लाख रुपये, स्त्री-पुरुषांसाठी नवीन शौचालयांच्या बांधकामासाठी ५३.७८ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत.
नगराध्यक्षा मोहिनी सावंत यांनी माहिती दिली की, नमो उद्यान प्रकल्पांतर्गत कृष्णाजी नगर येथे भव्य उद्यान उभारण्यासाठी १ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. तसेच हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे लोककल्याण अभियान अंतर्गत आरोग्य सेवेसाठी ५० लक्ष आणि शिक्षणासाठी ५० लक्ष असा एकूण १ कोटीचा स्वतंत्र निधी प्राप्त झाला आहे.
शहराच्या विकासासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सव्वा चार कोटी रुपये व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर सुशोभीकरण करण्यासाठी तब्बल ४५ लाख रुपयांचा निधी, चांदगुड गल्ली परिसरातील विकासासाठी ८० लाख रुपये तर मेन रोडच्या रस्ते कामासाठी तब्बल दीड कोटी रुपयाचा निधी उपलब्ध झालेला आहे.
ही सर्व कामे गुणवत्तेला प्राधान्य देऊन करीत आहे. येत्या काळामध्ये आपण शहराचा चेहरा मोहरा बदलणार आहोत. पालिकेची सेवा प्रत्येकाच्या दारापर्यंत नेण्याचा मनोदय आहे. लोकांनी घरपट्टी पाणीपट्टी भरून पालिकेला सहकार्य करावे. शहरातील नागरिकांच्या अडचणीं सोडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत .
— मोहिनी संजय सावंत (नगराध्यक्षा, करमाळा नगरपरिषद)
सत्तांतरानंतर अल्पावधीतच शहराच्या विविध भागांत रस्ते, गटारी आणि स्वच्छतेची कामे मार्गी लागणार असल्याने करमाळा शहरवासियांमधून कौतुक होत आहे.