कॉपीराइट उल्लंघन प्रकरणात बारामतीत कारवाई; 1180 बनावट सिलिंग पट्ट्यासह 82 हजारांचा माल जप्त
बारामती/प्रतिनिधी – वर्षा चव्हाण
नामांकित कंपनीच्या उत्पादनाच्या डिझाईनची नक्कल करून बनावट पी.ओ.पी. सिलिंग पट्ट्यांची विक्री करणाऱ्या दुकानावर बारामती शहर पोलिसांनी धाड टाकत तब्बल 82 हजार 600 रुपयांचा संशयित बनावट माल जप्त केला आहे. या प्रकरणी दुकान मालकाविरुद्ध कॉपीराइट कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्पीड सर्च अँड सिक्युरिटी नेटवर्क प्रा. लि., चंदीगड येथील फिल्ड एक्झिक्युटीव्ह सरफराज अब्दुल रऊफ तांबोळी यांनी SAINT-GOBAIN INDIA PRIVATE LIMITED कंपनीच्या उत्पादनाच्या डिझाईनची नक्कल करून पी.ओ.पी. सिलिंग पट्ट्यांची निर्मिती व विक्री होत असल्याची माहिती बारामती शहर पोलिसांना दिली होती.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी देशमुख वस्ती, पाटस रोड येथील समीर एंटरप्राईजेस या दुकानावर छापा टाकला. तपासणीदरम्यान कंपनीच्या मूळ उत्पादनाशी साधर्म्य असलेल्या पी.ओ.पी. सिलिंग पट्ट्यांचा मोठा साठा आढळून आला. पोलिसांनी 12 फूट लांबीच्या व 2 इंच रुंदीच्या एकूण 59 बंडलमधील 1180 नग सिलिंग पट्ट्या जप्त केल्या. जप्त मुद्देमालाची किंमत 82 हजार 600 रुपये इतकी असल्याचे सांगण्यात आले.
या प्रकरणी दुकान मालक शरफुद्दीन सैपूल्लाह कुरेशी (वय 38, रा. रेणुका नगर, फलटण रोड, बारामती) याच्याविरुद्ध बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 220/2026 अन्वये प्रतीलिपी अधिकार अधिनियम 1957 मधील कलम 51, 63 व 65 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राथमिक तपासात जप्त मालाचा उगम, उत्पादन व पुरवठा साखळी, विक्री व्यवहार, आर्थिक देवाणघेवाण तसेच उत्पादनासाठी वापरण्यात आलेली यंत्रसामग्री यांचा सखोल तपास सुरू आहे. संबंधित कंपनीकडून तांत्रिक व कायदेशीर अभिप्रायही मागविण्यात आला आहे.
बौद्धिक संपदा हक्कांचे उल्लंघन करून बनावट मालाची निर्मिती व विक्री करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला असून नागरिकांनी अशा संशयास्पद उत्पादनांबाबत माहिती असल्यास पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड तथा प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप भंडारे, पोलीस उपनिरीक्षक संजय जाधव, पोलीस शिपाई अक्षय सिताफ व वाहनचालक पोलीस शिपाई ऋषिकेश जाधव यांनी केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप भंडारे करीत आहेत.