जलवाहिनी फुटली नाही, फोडली गेली! जबाबदारांवर गुन्हा दाखल होणार का?”
अमळनेर : विक्की जाधव.
शहरातील मुंदडा नगर पाण्याच्या टाकीजवळ सुरू असलेल्या गटार कामादरम्यान ठेकेदाराने नगरपरिषदेची मुख्य जलवाहिनीच फोडल्याने परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
आधीच अनेक दिवसांपासून अनियमित पाणीपुरवठ्याचा सामना करणाऱ्या नागरिकांच्या जखमेवर पुन्हा मीठ चोळण्याचे काम या घटनेमुळे झाले आहे. आता पाणीपुरवठा पूर्ववत कधी होणार, याचे उत्तर मात्र प्रशासनाकडेही नसल्याचे चित्र आहे.

जरी संबंधित प्रभागातील नगरसेवक यांनी रात्रीं उशिरा पर्यंत उभे राहून लाईन जोडुन घेतली असली तरी त्या ठेकेदारावर कार्यवाही कां करून नये?
शहरात गेल्या तीन महिन्यांत शंभरपेक्षा अधिक वेळा विविध विकासकामांदरम्यान पाईपलाईन फुटल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र प्रत्येक वेळी नुकसान जनतेचे आणि फायदा ठेकेदारांचा, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. लाखो रुपयांची सार्वजनिक मालमत्ता उद्ध्वस्त होत असताना जबाबदारांवर ना दंडात्मक कारवाई, ना गुन्हे दाखल होत असल्याने नगरपरिषदेची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
सार्वजनिक पाणीपुरवठा खंडित करणे हा गंभीर प्रकार मानला जात असतानाही संबंधित ठेकेदारांविरुद्ध कठोर पावले उचलली जात नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. वारंवार जलवाहिन्या फोडूनही जर कोणावर कारवाई होत नसेल, तर कायद्याचा धाक फक्त सर्वसामान्यांसाठीच आहे का, असा सवाल आता नागरिक खुलेपणाने विचारू लागले आहेत.
दरम्यान, नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांच्याही भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. ठेकेदारांना पाठीशी घालण्याचे काम सुरू आहे का, की प्रशासन कारवाई करण्यास असमर्थ ठरत आहे, अशी चर्चा शहरभर रंगली आहे. मुंदडा नगरची जलवाहिनी फोडणाऱ्या संबंधित ठेकेदारावर तातडीने गुन्हा दाखल करून आर्थिक दंड आकारावा, अन्यथा नागरिकांचा रोष अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.