इंदापूर-मदनवाडीत शेतकऱ्यांना कृषी यंत्रसामग्रीचे वाटप : “शेतकरी सक्षम झाल्याशिवाय राज्य सक्षम होणार नाही” – कृषीमंत्री भरणे
(निलेश गायकवाड)
इंदापूर/मदनवाडी, दि. 9 : प्रतिनिधी
शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन शेतकऱ्यांचे उत्पादन खर्च कमी करणे आणि उत्पन्न वाढवणे हेच राज्य सरकारचे ध्येय असल्याचे प्रतिपादन कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.
शेती यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना इंदापूर आणि मदनवाडी येथे शनिवारी कृषी यंत्रसामग्रीचे वितरण त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
यंत्र वाटप आणि संवाद
कार्यक्रमात ट्रॅक्टर, पॉवर टिलर, कृषी अवजारे आदी यंत्रांचे वाटप करण्यात आले. मंत्री भरणे यांनी स्वतः छोट्या पॉवर टिलरवर बसून त्याची कार्यपद्धती जाणून घेतली आणि उपस्थित शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला.
“कृषी यांत्रिकीकरणामुळे मजुरांची कमतरता भरून निघेल आणि शेती अधिक परवडणारी होईल. पुढील 100 वर्षे इंदापूरच्या शेतीला पाण्याची कमतरता भासू नये यासाठी शासन प्रयत्नशील आहे” असे आश्वासन त्यांनी दिले.
शेतकरी हिताचे निर्णय
कृषीमंत्री पुढे म्हणाले,
1. कर्जमाफी – पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ लवकरच मिळणार आहे. यासाठी 31 लाख शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
2. वीज बिल सवलत – 7.5 HP पर्यंतच्या कृषीपंपाचे वीज बिल माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
3. नमो शेतकरी सन्मान योजना – या योजनेचे खडखडून लवकरच मार्गी लागतील.
राज्यातील पावसाची स्थिती 90 टक्के चांगली असल्याचे सांगत त्यांनी मराठवाड्यासाठी मात्र चांगल्या पावसाची गरज असल्याचे नमूद केले.
इतर घोषणा
यावेळी बोलताना मंत्र्यांनी “गोरगरिबांना सेवा द्या, त्यांना हेलपाटे मारायला लावू नका” अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच यासह मंगूर तळे प्रकरणात स्वतः लक्ष घातले असून दोषींवर कठोर कारवाई होईल, असेही ते म्हणाले.
या कार्यक्रमाला जि.प. सदस्या मेघना बंडगर, पं.स. सदस्या हेमाताई माडगे, सरपंच अश्विनी बंडगर, गुरप्पा पवार, पराग जाधव, सचिन बोगावत यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महादेव बंडगर यांनी केले.