अमळनेरकरांना पुढील ८ ते १० दिवस उशिराने पाणीपुरवठा; अतिवृष्टीमुळे मुख्य जलवाहिनी वाहून गेली

अपनी भाषा में पढ़े! Translate

IMG-20260801-WA0572

अमळनेरकरांना पुढील ८ ते १० दिवस उशिराने पाणीपुरवठा; अतिवृष्टीमुळे मुख्य जलवाहिनी वाहून गेली

 

अमळनेर : विक्की जाधव.

अमळनेर शहरात ३० जुलैच्या रात्रीपासून झालेल्या मुसळधार पावसाचा मोठा फटका नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा यंत्रणेला बसला असून, बोरी नदीपात्रातील पुलाखालील ५०० मिमी सी.आय. मुख्य जलवाहिनी पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने शहरातील अनेक भागांचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे काही भागात पुढील ८ ते १० दिवस, तर उर्वरित बहुतांश शहरातही सुमारे १० दिवस उशिराने पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती अमळनेर नगरपरिषदेने जाहीर केली आहे.

नगरपरिषदेने दिलेल्या माहितीनुसार, अतिवृष्टीमुळे गांधली जलशुद्धीकरण केंद्र परिसर आणि मुख्य पंपिंग मशिन्सजवळ मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. संभाव्य धोका टाळण्यासाठी मुख्य पंपिंग तात्पुरते बंद ठेवण्यात आले असून, पाणी ओसरल्यानंतर मशिन्सची तांत्रिक तपासणी व दुरुस्ती करूनच पाणी उपसा पुन्हा सुरू करण्यात येणार आहे.

दरम्यान, कोर्ट जलकुंभ, झामी चौक, लालबाग जलकुंभ, बोरी पंप हाऊस, तांबेपुरा आणि रामवाडी या भागांतील पाणीपुरवठ्यावर सर्वाधिक परिणाम झाला आहे. या भागात पुढील ८ ते १० दिवस उशिराने पाणीपुरवठा होईल. तसेच पैलाड जलकुंभ, मुंदडा नगर जलकुंभ आणि लक्ष्मीनगर जलकुंभ वगळता उर्वरित शहरातही पुढील दहा दिवस पाणीपुरवठा उशिराने होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

नगरपरिषद प्रशासनाने नागरिकांना उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे, दुरुस्तीच्या कामात सहकार्य करण्याचे आणि अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचेच पालन करण्याचे आवाहन केले आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे निर्माण झालेल्या या परिस्थितीबद्दल नागरिकांची गैरसोय होत असल्याची खंत व्यक्त करत प्रशासनाने दिलगिरीही व्यक्त केली आहे.

लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर, उपनगराध्यक्ष प्रशांत निकम आणि पाणीपुरवठा सभापती कैलास नामदेवराव पाटील यांनी दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असून, पाणीपुरवठा शक्य तितक्या लवकर पूर्ववत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!