कोयंबतूर येथे 90 कोटींचे “ऊस उत्कृष्टता केंद्र” होणार : शेतकऱ्यांना मिळणार नवीन तंत्रज्ञानाचे वरदान – हर्षवर्धन पाटील

अपनी भाषा में पढ़े! Translate

WhatsApp Image 2026-08-01 at 4.11.43 PM

कोयंबतूर येथे 90 कोटींचे “ऊस उत्कृष्टता केंद्र” होणार : शेतकऱ्यांना मिळणार नवीन तंत्रज्ञानाचे वरदान – हर्षवर्धन पाटील

(निलेश गायकवाड)

इंदापूर, दि. १ ऑगस्ट : प्रतिनिधी
देशातील ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर उद्योगासाठी मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. कोयंबतूर येथील आयसीएआर-शुगरकेन ब्रीडिंग इन्स्टिट्यूटमध्ये 90 कोटी रुपये खर्च करून “ऊस उत्कृष्टता केंद्र” उभारण्यात येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना कमी खर्चात अधिक उत्पादन आणि चांगला साखर उतारा मिळण्यास मदत होणार असल्याचे राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.

90 कोटींचा संयुक्त निधी
कोयंबतूर येथे शास्त्रज्ञांसोबत विचारमंथन बैठक, प्रयोगशाळा भेटी आणि क्षेत्रीय संवादानंतर शुक्रवारी दि. 30 रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत हर्षवर्धन पाटील बोलत होते.

ते म्हणाले, “राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ आणि इंडियन शुगर मिल्स असोसिएशन यांच्या पुढाकाराने हे केंद्र उभारले जाणार आहे. यासाठी साखर उद्योग 45 कोटी आणि केंद्र सरकार 45 कोटी असा एकूण 90 कोटींचा निधी संयुक्तपणे देणार आहे.”

यावेळी आयसीएआर-एसबीआयचे संचालक डॉ. पी. गोविंदराज, तामिळनाडू सरकारचे अतिरिक्त आयुक्त अरुणराज यांच्यासह इस्माचे मान्यवर उपस्थित होते.

शेतकऱ्यांना काय फायदा?
हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले की, हे उत्कृष्टता केंद्र शेतकऱ्यांना नवीन ऊस वाण, आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून मार्गदर्शन करेल.

केंद्राचे मुख्य उद्दिष्ट:
1. हवामान प्रतिकारक वाण – कमी पाणी, क्षारपड जमीन, जास्त पर्जन्यमान आणि उष्ण हवामानाला तोंड देणारे ऊस वाण विकसित करणे.
2. उत्पादन वाढ – खोडवा उत्पादनक्षमता आणि निविष्ठा-वापर कार्यक्षमता सुधारणे.
3. विविध उत्पादन – इथेनॉल, बायो-सीएनजी आणि ऊर्जेसाठी उपयुक्त ऊस वाण तयार करणे.

सध्या उसाच्या तुटवड्यामुळे गाळप हंगाम 150-160 दिवसांवरून 100 दिवसांवर आला आहे. केवळ 100 दिवसांच्या उसावर वर्षभर कारखाने चालवणे अवघड झाले आहे. अशा स्थितीत हे केंद्र शेतकऱ्यांसाठी आणि उद्योगासाठी महत्त्वाचे ठरणार आहे, असे ते म्हणाले.

साखर उद्योगाची मोठी उलाढाल
देशातील साखर उद्योग 6 कोटी शेतकऱ्यांना, 50 लाख कारखाना कर्मचाऱ्यांना आणि 1 कोटी हंगामी मजुरांना रोजगार देतो. या उद्योगाची वार्षिक उलाढाल 1.5 लाख कोटींहून अधिक असून शासनाला 16 हजार कोटींचा कर मिळतो, अशी माहितीही पाटील यांनी दिली.

आयसीएआर-एसबीआयचे संचालक डॉ. पी. गोविंदराज म्हणाले, “या निधीमुळे पायाभूत सुविधा बळकट होतील. जनुकशास्त्र आणि जीनोम एडिटिंग सारख्या तंत्रज्ञानाद्वारे रोगप्रतिकारक आणि हवामान बदलास सक्षम नवीन ऊस वाण विकसित करण्यास मदत होईल.”

चौकट
कोयंबतूर संस्था देशातील सर्वात जुनी – हर्षवर्धन पाटील
कोयंबतूर येथील आयसीएआर-शुगरकेन ब्रीडिंग इन्स्टिट्यूट ही भारतातील सर्वात जुनी ऊस संशोधन संस्था आहे. 1912 साली स्थापन झालेल्या या संस्थेने गेल्या 110 वर्षात देशातील ऊस वाण विकासात मोलाचे योगदान दिले आहे, असे गौरवोद्गार हर्षवर्धन पाटील यांनी काढले.

ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात सध्या 2 लाख शेतकरी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत. तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनीही ए.आय. उपक्रम राबवावा, असे आवाहन त्यांनी केले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!