खानवटे ग्रामपंचायतीतील मोठा घोटाळा उघड : केंद्र चालकाने 5 वर्षे काम न करताच घेतला लाखो रुपयांचा पगार
(निलेश गायकवाड)
दौंड, पुणे :
ग्रामपंचायतीचा लॉगिन आय.डी. परस्पर वापरून लाखो रुपये कमवणे आणि शासनाकडून दरमहा पगार लाटणे, असा गंभीर प्रकार खानवटे ग्रामपंचायतीत उघडकीस आला आहे. गेल्या 5 वर्षांपासून ग्रामपंचायत कार्यालयात एकही दिवस काम न करता केंद्र चालकाने शासनाचा लाखो रुपयांचा निधी लाटल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
नेमका प्रकार काय?
खानवटे ग्रामपंचायतीचे केंद्र चालक दत्तात्रय माणिक शेळके हे गेली 5 वर्षे ग्रामपंचायत कार्यालयात हजरच राहिले नाहीत. तरीही ते “आपले सरकार सेवा विभाग” दौंड पंचायत समितीकडून दरमहा 10,000 रुपये पगार घेत होते.
ग्रामपंचायत अधिकारी अनिल शिंदे यांच्या म्हणण्यानुसार, शेळके यांनी ग्रामपंचायतीचा लॉगिन आय.डी. परस्पर वापरून तो गावाबाहेरील खाजगी गाळ्यातून वापरला. खानवटे आणि परिसरातील गावांतील नागरिकांचे दाखले आणि इतर ऑनलाईन कामे करून त्यासाठी जास्तीचे पैसेही घेतले. याबत ग्रामपंचायतीला कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती.
“आंधळ दळतय आणि कुत्र पीठ खातय” अशी परिस्थिती ग्रामपंचायतीत निर्माण झाली असल्याची खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया
अनिल शिंदे, ग्रामपंचायत अधिकारी, खानवटे
“मी चार्ज घेतल्यापासून दत्तात्रय शेळके हे ऑफिसमध्ये एकदाही आले नाहीत. त्यांनी माझ्या परस्पर ग्रामपंचायतीचा लॉगिन आय.डी. वापरला आहे. याबाबत वरिष्ठांना तात्काळ लेखी पत्रव्यवहार करून कळविले जाईल.”
निनाद पोळ, तालुका समन्वयक, आपले सरकार सेवा विभाग, पंचायत समिती दौंड
“ग्रामपंचायतीचे ऑनलाईन कामकाज हे कार्यालयातच करणे बंधनकारक आहे. आय.डी. इतरत्र वापरता येत नाही. शेळके हे फक्त महिन्याच्या मिटींगला हजर असतात. संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली असून त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल.”
ग्रामस्थ आक्रमक
या प्रकारामुळे संतप्त झालेल्या खानवटे येथील ग्रामस्थांनी सखोल चौकशीची मागणी केली आहे. दोषींवर कठोर कारवाई न झाल्यास दौंड पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
शासनाच्या निधीचा गैरवापर आणि ग्रामस्थांच्या कामात अडथळा आणणाऱ्या या प्रकरणामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.