शिक्षकी पेश्यापलीकडचे कर्तव्य; मंदाकिनी भोई यांनी जपली माणुसकी! पुरग्रस्तांसाठी ठरल्या देवदूत..
अमळनेर : विक्की जाधव.
शहरात ३१ जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसाने आणि बोरी नदीच्या पुरामुळे पैलाड भागातील मातंगवाड्यावर अक्षरशः संकटाचा डोंगर कोसळला. पुराच्या पाण्याने अनेक कुटुंबांचा संसार वाहून गेला, घरातील जीवनावश्यक वस्तूंचे मोठे नुकसान झाले आणि अनेक महिला, लहान मुले व वृद्ध उघड्यावर आले. या विदारक परिस्थितीत अनेकजण मदतीची वाट पाहत असताना के. डी. गायकवाड हायस्कूलच्या शिक्षिका सौ. मंदाकिनी भोई या मात्र देवदूताप्रमाणे पुरग्रस्तांच्या मदतीसाठी धावून आल्या.
दररोज शाळेत ये-जा करताना या वस्तीतील गरिबी त्यांनी जवळून अनुभवली होती. मात्र पुरानंतर उद्ध्वस्त झालेला संसार, डोळ्यांत अश्रू आणि हातात काहीच उरले नसलेली कुटुंबे पाहून त्या भावूक झाल्या. त्यांनी कोणत्याही प्रसिद्धीचा विचार न करता आपल्या कुटुंबियांच्या मदतीने भाजी-भाकरी, खिचडीचे फूड पॅकेट तयार करून पुरग्रस्तांना प्रेमाने अन्न वाटप केले. “दोन घास प्रेमाचे आणि दोन शब्द धीराचे” देत त्यांनी संकटात सापडलेल्या कुटुंबांना मानसिक आधारही दिला.
इतकेच नव्हे तर पुराच्या पाण्यात महिलांचे कपडेही वाहून गेल्याचे लक्षात येताच मंदाकिनी ताईंनी स्वतःच्या चांगल्या प्रतीच्या साड्या गरजू भगिनींना वाटप केल्या. त्यांचे वयोवृद्ध सासू-सासरे तसेच सुपुत्र गौरव व भूषण यांनीही या सेवाकार्यात मोलाची साथ दिली. शिक्षकी पेशा केवळ ज्ञानदानापुरता मर्यादित नसून समाजाप्रती संवेदनशीलता आणि माणुसकीची जपणूक करण्याची मोठी जबाबदारीही असते, याचा जिवंत आदर्श त्यांनी आपल्या कृतीतून घालून दिला.
समाजसेवक व पक्षीमित्र तसेच अर्बन बँकेतील कॅशियर सुनील भोई यांच्या पत्नी असलेल्या सौ. मंदाकिनी भोई यांच्या या सेवाभावी कार्याचे परिसरातील नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे. नगरसेवक प्रताप छबुलाल साळी यांनीही त्यांच्या कार्याचे अभिनंदन केले. संकटाच्या काळात हात पुढे करणारे अनेक असतात, मात्र मायेची ऊब, मानवतेचा स्पर्श आणि निस्वार्थ सेवा देणारी अशी व्यक्तिमत्त्वेच समाजासाठी खऱ्या अर्थाने प्रेरणास्थान ठरतात. “माणुसकी अजूनही जिवंत आहे,” याचा प्रत्यय मंदाकिनी ताईंनी आपल्या कृतीतून संपूर्ण समाजाला करून दिला.