बारामती तालुका पोलिसांकडून भव्य सायबर जनजागृती अभियान; १,८०० नागरिकांना सायबर सुरक्षेचे धडे
बारामती,प्रतिनिधी – वर्षाचव्हाण
वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी बारामती तालुका पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण यांच्या वतीने शनिवारी (दि. १) विद्यानगरी येथील गदिमा हॉलमध्ये भव्य सायबर अवेअरनेस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत झालेल्या या कार्यक्रमाला सुमारे १,५०० ते १,८०० नागरिक, विद्यार्थी व विविध क्षेत्रातील प्रतिनिधींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमास उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम, पोलीस निरीक्षक नारायण पवार, विद्या प्रतिष्ठानचे उपप्राचार्य खोत सर, एमआयडीसीमधील विविध कंपन्यांचे व्यवस्थापन, पोलिस पाटील, व्यापारी संघटना, एमआयडीसी प्रतिनिधी, शांतता समिती सदस्य, ज्वेलर्स असोसिएशनचे पदाधिकारी, बँक अधिकारी व कर्मचारी तसेच विद्यानगरीतील आर्ट्स, कॉमर्स, सायन्स आणि इंजिनिअरिंग महाविद्यालयांचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम आणि पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी सायबर गुन्ह्यांचे बदलते स्वरूप, त्यापासून बचावाचे उपाय आणि नागरिकांनी घ्यावयाची काळजी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, पूर्वी चोर घरात घुसून चोरी करत असत; मात्र आजचा चोर मोबाईल आणि इंटरनेटच्या माध्यमातून नागरिकांना लक्ष्य करतो. डिजिटल व्यवहार वाढल्याने सायबर गुन्हेगार विश्वास संपादन करून फसवणूक करत असल्याने प्रत्येक नागरिकाने सतर्क राहणे आवश्यक आहे.
यावेळी “डिजिटल अरेस्ट” या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीबाबत विशेष जनजागृती करण्यात आली. स्वतःला पोलीस, CBI, ED किंवा RBI अधिकारी असल्याचे भासवून व्हिडिओ कॉलद्वारे नागरिकांना धमकावून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र भारतात “डिजिटल अरेस्ट” अशी कोणतीही कायदेशीर प्रक्रिया अस्तित्वात नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. अशा प्रकारचे फोन आल्यास घाबरून न जाता त्वरित पोलीस किंवा सायबर पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.
तसेच UPI आणि QR Code फसवणूक, OTP, PIN, CVV आणि KYC अपडेटच्या नावाखाली होणारी फसवणूक, WhatsApp हॅकिंग, बनावट सोशल मीडिया प्रोफाइल, ऑनलाइन शॉपिंग फसवणूक, नोकरीचे आमिष, जास्त परताव्याचे आश्वासन देणारी गुंतवणूक, AnyDesk व TeamViewer सारख्या अॅपद्वारे मोबाईलचा ताबा घेणे, तसेच Sextortion, Matrimonial आणि पार्सल-कुरिअर फसवणूक अशा विविध प्रकारच्या सायबर गुन्ह्यांची उदाहरणांसह माहिती देण्यात आली.
नागरिकांनी OTP, UPI PIN, CVV, पासवर्ड कोणालाही सांगू नयेत, अनोळखी लिंकवर क्लिक करू नये, QR Code विचारपूर्वक स्कॅन करावा, प्रत्येक खात्यासाठी वेगळा व मजबूत पासवर्ड ठेवावा, Two-Factor Authentication सुरू करावे, मोबाईल व अॅप्स नियमित अपडेट करावेत आणि सोशल मीडियावर वैयक्तिक माहिती मर्यादित प्रमाणातच शेअर करावी, असे मार्गदर्शन करण्यात आले.

सायबर फसवणूक झाल्यास घाबरू नये किंवा लाज बाळगू नये, तात्काळ राष्ट्रीय सायबर हेल्पलाईन क्रमांक १९३० वर संपर्क साधावा किंवा राष्ट्रीय सायबर गुन्हे पोर्टलवर तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले. तसेच व्यवहाराचे स्क्रीनशॉट, कॉल रेकॉर्ड, संदेश आणि इतर पुरावे जतन करण्याचे महत्त्वही अधोरेखित करण्यात आले. “पहिले २४ तास म्हणजेच गोल्डन अवर अत्यंत महत्त्वाचे असतात. वेळेत तक्रार केल्यास फसवलेली रक्कम गोठविण्याची शक्यता वाढते,” असेही अधिकाऱ्यांनी नमूद केले.
कार्यक्रमात अमली पदार्थविरोधी जनजागृती, त्यांचे दुष्परिणाम तसेच आपत्कालीन परिस्थितीत डायल ११२ या सेवा क्रमांकाचा प्रभावी वापर कसा करावा याबाबतही उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांना आपल्या कुटुंबातील ज्येष्ठ नागरिक, महिला आणि विद्यार्थ्यांपर्यंत सायबर सुरक्षेचा संदेश पोहोचविण्याचे आवाहन करण्यात आले. “सायबर गुन्हेगार तुमच्या घाईचा आणि भीतीचा फायदा घेतात. त्यामुळे कोणताही फोन, मेसेज किंवा लिंक आल्यास आधी विचार करा, मगच कृती करा. सतर्क राहा, सुरक्षित राहा,” असा संदेश देत “सायबर सुरक्षित भारत, सुरक्षित नागरिक” हा संकल्प उपस्थितांकडून व्यक्त करण्यात आला.